डॉ. किरण कुलकर्णी - यांचा सामाजिक संदेश देणारा कथासंग्रह "प्रवासी"
डॉ. किरण कुलकर्णी - यांचा सामाजिक संदेश देणारा कथासंग्रह "प्रवासी"
मला नव्या नव्या मराठी साहित्याच्या वेबसाईटवर साहित्य बघण्याचा छंद आहे. मराठीमध्ये अनेक लेखकांनी त्यांनी लिहिलेले लिखाण वेबसाईटवर टाकले आहे. ते शोधून वाचताना नेहमीच्या गाजलेल्या मराठी कादंबऱ्या, कथा याच्या पलिकडे नवीन काही सापडत असते.
काल असेच वेगवेगळ्या वेबसाईट बघत असताना डॉ. किरण कुलकर्णी या लेखकाचा कथासंग्रह आणि एकांकिका संग्रह त्यांच्या वेबसाईटवर पाहण्यात आला. "प्रवासी" या त्यांच्या कथा संग्रहात मोजक्याच कथा आहेत. पण प्रत्येक कथा वेगळ्या धाटणीची असल्यामुळे सगळ्याच कथा छान वाटल्या. एका कथेवर मराठीचे प्रसिध्द कथा लेखक श्री.जी. ए. कुलकर्णी यांचा प्रभाव जाणवला तर दुसरी कथा विनोदी आहे आणि ती खुसखुशीत पध्दतीने दिवंगत मराठी कथा लेखक श्री. द. मा. मिरासदार यांच्या शैलीसारख्या शैलीतून लिहिले आहे. एकच लेखक अशा वेगवेगळ्या पध्दतीने कथा लिहू शकतो हे मला छान वाटले. एका क्रांतीकारकाची स्फूर्ति कथा आणि दोन नक्षत्रकथा यांनी "प्रवासी" कथा संग्रहाला वेगळ्या उंचीवर नेले आहे. देवयानी नक्षत्र समूह आणि अढळ ध्रुव ताऱ्याची गोष्ट यांना दिलेली वैज्ञानिक माहितीची जोड अप्रतिम.
थिएटरचा पडदा उघडल्यावर" या डॉ. किरण कुलकर्णी यांच्या एकांकिका संग्रहात आसवांचे मालक बाल कामगार आणि पर्यावरण राजा ही प्रदुषणाबाबतचे पथनाटय या दोन्ही नाटुकल्यांनी सामाजिक आशय मांडला आहे. महावस्त्रांची महाराणी पैठणी ही एकांकिकेपेक्षा डॉक्युड्रामाची संहिता आहे. तेहतीस कोटी एक ही विज्ञान एकांकिका आणि "अंधारछाया” ही रहस्यमय एकांकिका याचबरोबर "पराभव" यासारख्या कौटुंबिक शोकांकिका असे वैविध्य वाचनीय आहे. चिरेबंदी या एकांकिकेवर जॉर्ज ऑरवेलच्या अॅनिमल फार्म या कादंबरीचा प्रभाव मराठी साहित्यामध्ये आणि मराठी संदर्भात जाणवण्याजोगा आहे. सगळ्याच एकांकिका रंगभूमींवर सादर करण्याजोग्या आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याऱ्या आहेत.
एकांकिका लेखन आणि कथा लेखन या दोन्ही क्षेत्रात डॉ. किरण कुलकर्णी यांनी आणखी लिहित राहावे ही शुभेच्छा.
राजेश उपासनी, धुळे. ९४२२७९५९१३