अहिल्याबाई होळकर जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्ताने सौ. अर्चनाताई चितळे ( इंदौर ) यांचा एकपात्री प्रयोग

नाशिक -राष्ट्र सेविका समिती, नाशिक आणि स्वातंत्र्यलक्षमी राणी लक्ष्मीबाई स्मारक समिती नाशिक यांच्या वतीने, अहिल्याबाई होळकर जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्ताने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित चित्त वेधक एकपात्री प्रयोग गेल्या दोन दिवसात म्हणजेच दिनांक २१,२२ डिसेंबर २०२४ रोजी ठीक सायंकाळी ६ वाजता सादर करण्यात आले. शनिवार दिनांक २१ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता कुर्तकोटी शंकराचार्य सभागृह,जुना गंगापूर नाका, नाशिक आणि दिनांक २२ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता डे केअर सेंटर शाळा व ज्युनिअर कॉलेज, राजीव नगर, नाशिक येथे हे एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण झाले. एकपात्री प्रयोगाचा कालावधी हा साधारण १ तासाचा होता. या कार्यक्रमाचे आयोजन हे संस्था सचिव सचिव सौ. शोभा ताई गोसावी तसेच समिती च्या नाशिक शहर कार्यवाहीका सौ. सुहासिनी ताई रत्नपारखी यांनी केलेले होते. हा प्रयोग विनाशुल्क आणि सर्वांसाठी खुला होता. सदर कार्यक्रमाला बंधू, भगिनी, बालवृद्ध यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आयोजित अहिल्याबाई होळकर एकपात्री नाटक प्रयोग अप्रतिम छानच झाला. दोन्हीही दिवशी सर्वप्रथम मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी दोन्हीही दिवशी भगिनींनी शंखनाद केला. बालसेविकांचे समूहगीत सादरीकरण अतिशय जोशपूर्ण व तालासुरात झाले. कार्यक्रमाचा शुभारंभ अतिशय सुंदर झाला. राष्ट्र सेविका समिती ही स्त्रियांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी ८८ वर्षाहून अधिक काळ कार्य करणारी संघटना आहे. जिची स्थापना वंदनीय मावशी तसेच लक्ष्मीबाई केळकर यांनी केली १९३६ साली केली. पुढे १९५८ साली वंदनीय मावशींनी समितीचे भारतातील १ ले प्रतिष्ठान - स्वातंत्र्य लक्ष्मी राणी लक्ष्मीबाई स्मारक समितीची उभारणी केली. दूरदृष्टी असणाऱ्या व काळाच्या पुढे बघू शकणाऱ्या व्यक्तींमुळेच आज गेली ६४/६५ वर्षे राणी भवन संस्थेचा विस्तार विविध उपक्रमामुळे होत आहे. राष्ट्र सेविका समितीची रचना करतानाच वंदनीय मावशींनी संघटने पुढे ३ आदर्श ठेवलेले आहेत ---
१) आदर्श नेतृत्व म्हणून झाशीची राणी लक्ष्मीबाई.
२) आदर्श मातृत्वासाठी राजमाता जिजामाता ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडविले.
३) आदर्श दातृत्व म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर.
२०२४ हे वर्ष आपण सर्व अहिल्यादेवीचे जन्म त्रि शताब्दी वर्ष म्हणून साजरे करत आहोत. कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी ही राणी असूनही,एक व्रतस्थ जीवन जगली. आपले सर्व ऐश्वर्या प्रजेच्या हितासाठी, मुघली आक्रमणामुळे उद्ध्वस्त झालेल्या मंदिरांचा जिर्णोद्धार करण्यासाठी, विविध तीर्थस्थळांच्या ठिकाणी घाट बांधण्यासाठी आपली सर्व संपत्ती खर्च केली. सौ अर्चनाताई चितळे ( इंदौर) यांनी आपल्या बोलण्यातून, अभिनयातून साक्षात अहिल्यादेवी होळकर सर्वांसमोर साकारली होती. आवाजातील चढ उतार, शब्द फेक अतिशय प्रभावी असेच होते. वैवाहिक जीवन, जबाबदा-या, कर्तव्य इत्यादी गोष्टी कथन अभिनयाद्वारे सर्वांसमोर सादर केले. पती निधनानंतर सुद्धा डगमगून न जाता सर्वच जबाबदाऱ्या,कर्तव्य तेवढ्याच खंबीरपणे पार पडल्या हे सर्व ऐकताना व पाहताना सर्वच श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. १ तासभर या कार्यक्रमाचा आस्वाद रसिकांनी घेतला. या कार्यक्रमाला रसिकांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व सेविकांनी अतिशय परिश्रम घेतले होते. साऊंड सिस्टिम तसेच प्रकाशयोजना खूपच छान होती. एकूणच सर्व कार्यक्रम `न भूतो न भविष्यतीʼ असाच झाला. ठिकठिकाणी समिती च्या बाल शाखा असतात. तसेच गृहिणी शाखा पण असतात. राष्ट्र सेविका समिती स्थापन केल्यामुळे या सर्व बाल सेविकांना घडविण्याचे काम राष्ट्र सेविका समिती करत आहे. ही विशेष उल्लेखनीय बाब आहे.
श्री किरण शानी या प्रयोगाचे लेखक तसेच दिग्दर्शकही आहेत. गेल्या ३५ वर्षापासून ते नाट्य क्षेत्रात आहेत. या महानाट्याचे अनेक प्रयोग भारतात विविध ठिकाणी झालेले आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी `अप्रतिम ʼअशी त्रिवार दादही दिली आहे. सौ. दीपाताई शानी या संगीत प्रोफेसर आहेत कथ्थक तसेच शास्त्रीय संगीताच्या विशारद आहेत. या कार्यक्रमाची संगीत व नृत्याची बाजू त्यांनीच सांभाळली होती. सौ. चित्राताई अंतरकर यांनी कार्यक्रमाची रंगभूषा सांभाळली होती. त्या प्रोफेशनल बॉलीवूड मेकअप वूमन आहेत. श्री अभिजीत निरखीवाले हे या प्रकल्पाचे प्रमुख आहेत. त्यांना तर या प्रोजेक्टची मास्टर की म्हणून संबोधले गेले आहे. सौ.अर्चनाताई चितळे (इंदौर) यांच्या बद्दल तर आता शब्दच उरले नाहीत. प्रत्यक्ष अहिल्याबाई होळकर नाशिक मध्ये अवतरल्या होत्या. सौ अर्चना चितळे ताई यांना उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तसेच सर्व बालसेविका व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्यांना शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता झाली.
त्यानंतर सर्वात शेवटी सन्मान सोहळा झाला. अहिल्याबाईच्या मुख्य भूमिकेत असणाऱ्या माननीय सौ. अर्चनाताईंचा सन्मान समितीच्या शहर कार्यवाहीका माननीय सौ. सुहासिनी ताई रत्नपारखी ताईंनी केला. या कार्यक्रमाचे लेखक दिग्दर्शक माननीय श्री किरणजी शानी यांचा सन्मान राणी भवन संस्थेच्या सहसचिव माननीय सौ वंदनाताई कुलकर्णी यांनी केला. संगीत आणि नृत्याची बाजू मांडणाऱ्या सौ दीपाताई शानी यांचा सत्कार समितीच्या ज्येष्ठ सेविका सौ वर्षा ताई वाकदकर यांनी केला. सौ. चित्राताई अंतरकर यांचा सन्मान सौ. वंदना ताई मोघे यांनी केला. प्रोजेक्टची मास्टर की असणारे श्री अभिजीत निरखीवाले यांचा सत्कार सौ आर्या बुडूख यांनी केला. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी सौ. अर्चना ताईं सोबत फोटो काढून सर्वानी आनंद घेतला. एकपात्री प्रयोगातून अहिल्याबाईंचे हुबेहुब चरित्र बघायला मिळाल्याने सगळ्यांनीच संस्था आणि समितीला खूप खूप धन्यवाद दिले. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी तर उठून, अगदी हात जोडून, प्रत्यक्ष भेटून आपल्या भावना व्यक्त केल्या. दिनांक २१ आणि २२ डिसेंबर या दोन्ही दिवशी मिळून श्रोत्यांची उपस्थिती ही १२०० च्या वर होती.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन , प्रास्ताविक आणि परिचय दिनांक २१ रोजी सौ. शुभदा राजे यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ.सौ. रचना खांडवे यांनी केले.
दिनांक २२ रोजी सूत्रसंचलन, प्रास्ताविक आणि परिचय सौ. सोनाली काळे यांनी केले. तर सुवर्णाताई शुक्ल यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.