नाशिक रोड येथील ब्रह्माकुमारी सेवा केंद्रात दिवाळी भाऊबीज कार्यक्रमाचे आयोजन

नाशिक रोड येथील ब्रह्माकुमारी सेवा केंद्रात दिवाळी भाऊबीज कार्यक्रमाचे आयोजन

मनुष्यापासून देवता बनायचे आहे हा उद्देश ठेवूनच ब्रह्माकुमारी संस्थे मध्ये ज्ञान दिले जाते- ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी

>>>>नाशिक रोड येथील ब्रह्माकुमारी सेवा केंद्रात दिवाळी भाऊबीज कार्यक्रमाचे आयोजन<<<<<

नाशिक-  मनुष्य आपल्यासोबत नेहमी आपल्या कर्माचा लेखाजोखा घेऊन जात असतो. आत्मा अविनाश आहे तसेच त्याच्या कर्माचा खाता  सुद्धा अविनाशी आहे.  ब्रह्माकुमारी संस्थेचे ज्ञान आपल्याला हे शिकवते की श्रेष्ठ कर्मांद्वारे आपण सुख प्राप्त करू शकतो तर वाईट कर्मामुळे आपल्याला दुःख मिळते. कर्मफळ हे आपल्या कर्मांचेच प्रतिबिंब आहे. मनुष्यापासून देवता बनायचे आहे हा उद्देश ठेवूनच ब्रह्माकुमारी संस्थे मध्ये ज्ञान दिले जाते. या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी श्रेष्ठ कर्म सुद्धा करणे आवश्यक आहे. कारण आज आपण श्रेष्ठ कर्म करू तर उद्या देवता नक्कीच बनणार यात काही शंका नाही. कोणत्याही परिस्थितीत आपले कर्म हे श्रेष्ठ असलेच पाहिजे समोरचा व्यक्ती त्याच्या संस्कारामुळे वाईट जरी वागला तरी आपण त्याच्याविषयी शुभ भावना शुभकामना ठेवायला पाहिजे कारण चांगल्या कर्माचे फळ आपल्यालाच मिळत असते. असे प्रतिपादन नाशिक जिल्हा मुख्य संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांनी केले. 

दिनांक 3 नोव्हेंबर रोजी नाशिक रोड येथील ब्रह्माकुमारी सेवा केंद्रात दिवाळी भाऊबीज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली.  याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त कारागृह उपअधीक्षक जी के गोपाळ, रेडिओ विश्वासच्या मुख्य समन्वयक रूचा विश्वास ठाकूर, इंडियन सिक्युरिटी प्रेस  सीआयएसएफ निरीक्षक  कीर्ती कुमार, साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष प्रवीण जोशी सर, उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, क्रांतिवीर व्ही एन नाईक शिक्षण संस्था शिक्षणाधिकारी इ.के.कांगणे सर, मुख्याध्यापक जिल्हा संघाचे मार्गदर्शक सुभाष टिळे सर, सामाजिक कार्यकर्ते ऍड निलेश सानप, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे सर,

दैनिक महासागर संपादक जयंत महाजन, 

बीके गोदावरी दीदी, बिके शक्ती दीदी,  बीके विना दीदी, बी के मनीषा दीदी बिके ज्योती दीदी बी के कावेरी दीदीआदी मान्यवर उपस्थित होते.

भाऊबीजचे रहस्य उद्घाटित करताना आदरणीय वासंती दीदीजी यांनी पुढे सांगितले की आज आपण येथे दिवाळी भाऊबीज सणानिमित्त एकत्रित झालो आहोत.  येथे ठेवलेले हे दीपक म्हणजे आत्म जागृतीचे प्रतीक आहेत. प्रत्येकाने आपला आत्मरुपी दीवा जागृत करून दिव्य गुणांची धारणा करावी ज्यायोगे मनुष्या पासून देवता बनणे 100% शक्य होणार आहे. आत्मजागृती करण्यासाठी व परमात्म्याचा सत्य परिचय प्राप्त करून घेण्यासाठी ब्रह्माकुमारी संस्थेचा नि:शुल्क साप्ताहिक राजयोग मेडिटेशन कोर्स अवश्य करावा असेही आवाहन दीदीजींनी याप्रसंगी केले. 

प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष प्रवीण जोशी यांनी सांगितले की वीस वर्षांपूर्वी ब्रह्माकुमारी संस्थेचे ज्ञान एका भगिनीने मला दिले.  त्यातून माझ्या जीवनत अमुलाग्र  बदल झाला. दृढ इच्छाशक्तीने रात्री झोपताना आपली तपासणी करायला हवी, की आपण कोणाला काही दुःख तर नाही दिले,  मोहमाया दूर करून सद्गुण धारण केल्यास याचा समाजाला नक्कीच उपयोग होईल. ब्रह्माकुमारी संस्थेच्या दिव्या कार्यात आमच्या संस्थेतर्फे जी काही मदत होईल ती देण्यास मी सहर्ष तयार आहे असेही प्रतिपादन जोशी सर यांनी याप्रसंगी केले.

निवृत्त कारागृह उपअधीक्षक व सर्वधर्म समभाव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जीके गोपाल यांनी सांगितले की स्वतः साठी तर कोणीही जगते मात्र दुसऱ्यासाठी जगण्यालाच जीवन म्हणावे. आपल्या कार्यकाळात 14 कारागृहांचे प्रमुख असताना ब्रह्माकुमारी संस्थेचे अनेक कार्यक्रम घेण्याचा मला योग आला. यातून  गुन्हेगारांच्या मनोवृत्तीत विस्मयकारक बदल अनुभवले. ब्रह्मा बाबांचा शांतीचा संदेश अतिशय महत्त्वाचा असून समाजाला त्यांनी एका सूत्रात बांधण्याचा प्रयत्न केला आहे असेही जी के गोपाल यांनी नमूद केले. 

उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी  सांगितले की, व्यक्तीमध्ये अनेक दुर्गुण विकार असतात. ज्याप्रमाणे आपण घराची साफसफाई करतो त्याप्रमाणे या विकारांचे जाळेजळमट्यांना स्वच्छ करणे गरजेचे आहे. आमच्याकडे अनेकांच्या समस्या येत असतात या समस्या या कुठे ना कुठे आपल्यातील किंवा इतरांच्या दुर्गुणांमुळे असतात हे दुर्गुण साफ, स्वच्छ करण्यासाठी ब्रह्माकुमारी संस्था अतिशय उत्तम माध्यम आहे असे मत सपकाळे यांनी मांडले.

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्था शिक्षणाधिकारी इ.के.कांगणे सर यांनी  गोड व सुंदर अशा कार्यक्रमात येऊन दीदींच्या प्रवचनाचा योग लाभल्यामुळे धन्यता मानली. दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर इतक्या मंगलमय प्रसंगी आपण एकत्रित झालो आहोत तेव्हा आपल्या मनातील द्वेष तिरस्कार हा नष्ट झाला पाहिजे.  सर्वांनी सुख समाधानाने व आनंदित रहावे अशा शुभेच्छा कांगणे सरांनी याप्रसंगी व्यक्त केल्या 

मुख्याध्यापक जिल्हा संघाचे मार्गदर्शक सुभाष टिळे यांनी सांगितले की सत्कर्म म्हणजे काय याचे मार्गदर्शन ब्रह्माकुमारी संस्थेच्या सत्संगामधून मिळते. या कार्यक्रमात उपस्थित राहणे हा क्षण माझ्या जीवनाला नक्कीच कलाटणी देणारा क्षण आहे. आपण चांगले सत्कर्म करत राहावे चांगल्या गोष्टी आपोआपच आपल्याला मिळतील, हा निसर्गाचा नियम आहे. ब्रह्माकुमारी संस्थेत पापात्मापासून पुण्यआत्मा बनण्याच्या कार्यात मीही सामील झालो याचा मला खरोखर आनंद वाटत आहे. 

दैनिक महासागर संपादक जयंत महाजन यांनी ब्रह्माकुमारी संस्थेसोबत आलेले अनुभव प्रस्तुत केले. वैयक्तिक कामासाठी पोखरणला जात असताना वाटेत ड्रायव्हरला विश्रांती मिळावी म्हणून काही क्षण गाडी थांबवली,  मात्र समोरच ब्रह्माकुमारी संस्थेचे सदस्य भेटले व त्यांच्यासोबत ब्रह्माकुमारी संस्थेच्या मुख्यालयात गेलो व तेथेच रमलो. या ठिकाणी गेल्यानंतर मनाला खूप शांती लाभली. ब्रह्माकुमारी संस्थेचे विचार अतिशय वेगळे आहेत. दैनंदिन धकाधकीच्या आयुष्यात असताना ब्रह्माकुमारी परिवाराच्या सानिध्यात आल्यानंतर एक नैतिक बळ मिळते. वर्तणूक कशी ठेवावी हे आपल्याला कळते. पोलीस, कारागृह प्रशासन असो वा आम्ही पत्रकार असो,  आमच्या अवतीभवती चांगला समजत येत नाही. समाजातील वाईट लोकांचे सानिध्य लाभते व त्यांच्या विषयी वाईटच लिहिले जाते. अशा पार्श्वभूमीवर ब्रह्माकुमारी संस्थेच्या सानिध्यात आल्यावर नंतर सुखद वातावरण लाभते. येथील पांढरे स्वच्छ कपडे बघितल्यानंतर डोळ्याला शांती लाभते, या आनंदी परिवारात सहभाग घेता येतो. लंडन येथे ब्रह्माकुमारी आश्रमात ध्वजारोहण करण्याचा मान मिळाल्यामुळे आनंद वाटला असेही महाजन यांनी याप्रसंगी सांगितले. 

रेडिओ विश्वासच्या मुख्य समन्वयक रूचा विश्वास ठाकूर यांनी सांगितले की ब्रह्माकुमारीचे फक्त मेडिटेशन पुरताच कार्य नाही तर याही पलीकडे समाजसेवेचे मोठे कार्य संस्थेतर्फे होत आहे. माउंट आबू येथील रेडिओ मधुबन व रेडिओ विश्वास हे गेल्या दोन वर्षांपासून घरेलू हिंसाचार या विषयावर काम करीत आहेत. ब्रह्माकुमारी मुख्यालयाशी संपर्क झाल्यावर येथे कार्यक्रमासाठी आल्याबद्दल ऋचा ठाकूर यांनी धन्यता मांनली.

इंडियन सिक्युरिटी प्रेस  सीआयएसएफ निरीक्षक  कीर्ती कुमार यांनी सांगितले की 2006 पासून ब्रह्माकुमारी संस्थेच्या सानिध्यात आहे.  2009 साली संस्थेच्या मुख्यालयात जाण्याचा योग आला.  2010 ते 2012 मध्ये तर संस्थेच्या  प्रशासिका आदरणीय ब्रह्माकुमारी गुलजार दादीजी यांना एअरपोर्टवर सेवा देण्याची  संधी मिळाली त्यांच्याकडून प्रसाद लाभला ही भाग्यची गोष्ट आहे. मनुष्यापासून देवता बनण्याच्या या कार्यात यापूर्वीच इतके साधक जुळले आहेत मी ही यात शामील झालो याची कीर्ती कुमार यांनी धन्यता मानली. 

आभार प्रदर्शन ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी यांनी तर सूत्रसंचालन ब्रह्माकुमार दिलीप भाई यांनी केले. कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांना आदरणीय ब्रह्माकुमारी वासंती दीदी जी यांच्या शुभहस्ते  ईश्वरीय भेट वस्तू व प्रसाद देऊन सत्कारित करण्यात आले. भरगच्च भरलेल्या सभागृहाने भरगच्च कार्यक्रमाचा भरगच्च आनंद लुटला.