महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नाशिक आगारातर्फेसु रक्षितता अभियान 2025 चे समारंभ पूर्वक उद्घाटन

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नाशिक आगारातर्फे सुरक्षितता अभियान 2025 चे समारंभ पूर्वक उद्घाटन
नाशिक- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नाशिक आगारातर्फे दिनांक 11 जानेवारी रोजी सुरक्षितता अभियान 2025 चे समारंभ पूर्वक उद्घाटन झाले. हे अभियान दिनांक 11 जानेवारी ते 25 जानेवारी 2025 पर्यंत राबवण्यात येणार आहे. या कालावधीत विविध सामाजिक संस्था व शासनाच्या विविध विभागाला सोबत घेऊन हे अभियान यशस्वीरित्या राबवावे असे परिपत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई यांनी काढलेले आहे.
नाशिक येथील एन डी पटेल रोड येथील आगार कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक अरुण सिया उपस्थित होते, तर उद्घाटक म्हणून मुंबई नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे, ब्रह्माकुमारी गोदावरी दीदीजी ब्रह्माकुमारी वीणा दीदीजी ब्रह्माकुमार दिलीप भाई राज्य परिवहन यंत्र अभियंता श्रावण सोनवणे, विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले, तसेच सहायक पोलीस आयुक्त ट्राफिक सुधाकर सुराडकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली
विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले की आपल्या एसटी कडे लोक खूप विश्वासाने बघतात एकटी महिला जरी लांब प्रवास करत असेल तरी तिला सुरक्षित वाटत असते. मात्र प्रवाशांना सेवा देत असताना आपले अपघाताचे प्रमाण सुद्धा कमी झाले पाहिजे असाही सल्ला याप्रसंगी सिया यांनी दिला.
सहायक पोलीस आयुक्त ट्राफिक सुधाकर सुराडकर यांनी सांगितले की नासिक मध्ये नियमांची पायमल्ली होताना दिसते. आम्ही तीन महिन्यापासून याविषयी कसोशीने प्रयत्न करीत आहोत. नियम पाळणे हे अतिशय गरजेचे आहे, नशा पाणी करून वाहन चालवल्यास खूप मोठ्या दंडाला सामोरे जावे लागते. यातच अपघात झाला तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो. त्यामुळे आपण आपल्या कामावर असताना सकारात्मक विचार करावा मोबाईलचा वापर टाळावा कोणतेही समस्या असतील तर वरिष्ठांशी सल्लामसलत करून त्यावर तोडगा काढूनच मोकळे मनाने कामावर जावे असा सल्ला सुराडकर यांनी या प्रसंगी दिला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांनी सांगितले की राज्य परिवहन महामंडळाने वीस वर्ष विना अपघात सेवा देणाऱ्यांचा सत्कार येथे केला गेला. ही अतिशय स्तुत्य बाब आहे मात्र याही पुढे जाऊन मी असे सुचवेल की हा सन्मान दरवर्षी ज्यांनी एकही अपघात केला नाही त्यांचा सुद्धा व्हायला हवा जेणेकरून त्यांना याही पुढे चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल.
ब्रह्माकुमारी गोदावरी दीदीजी यांनी सांगितले की गाडीच्या स्पीड पेक्षा मनाच्या वेगामुळे अपघात होण्याचे शक्यता अधिक असते मनातील नकारात्मक विचार तीव्र वेगाने येणारे विचार, निकृष्ट दर्जाचे विचार यामुळे बऱ्याच अंशी अपघातांना सामोरे जावे लागते. अनेकांना आपल्या कुटुंबाचा तणाव शारीरिक आजारांचा तणाव किंवा रस्त्यावरील गर्दीचा तणाव निर्माण होत असतो. म्हणूनच आपले मन हे शांत कसे राहील याचा विचार करावा. जर आपले मन सकारात्मक असेल तर तीव्र गतीला सुद्धा आपण कंट्रोल करू शकतो व अपघातापासून वाचू शकतो.
ब्रह्माकुमारी वीणा दीदीजी यांनी सांगितले की जे काही आपण ऐकत असतो ते आपण आचरणात आणणे खूप गरजेचे आहे हा चरणात आणण्यासाठी आचरणशक्ती वाढवण्यासाठी राजयोग मेडिटेशन खूप सहाय्यभूत होत असतो. कोणत्याही घटनेत दुसऱ्यांची चुकी दर्शविण्यापेक्षा आपण अंतर मनात डोकावून आपली चूक शोधावी. जशी दृष्टी तशी सृष्टी असते त्यामुळे आपण ज्या चष्म्याने बघू तसाच समाज आपल्याला दिसतो. याप्रसंगी ब्रह्माकुमारी विणा दीदी जी यांनी मेडिटेशन कॉमेंट्री करून उपस्थित त्यांना अंतर मनाची सफर घडवून दिली.
ब्रह्माकुमार दिलीप बोरसे यांनी आपल्या वक्तव्यात सांगितले की ज्या प्रकारे आपल्याला जगातील अनेक गोष्टी माहिती असतात मात्र आपले मन कुठे आहे हे आपल्याला माहीत नसते हे सांगण्याचे कार्य ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये केले जाते आज उद्भवणारे 90% आजार हे सायकोसोमॅटिक अर्थात मनाच्या गुंतागुंतीतून निर्माण होत असतात, त्यामुळे आपले मन कोठे आहे व या मनाला शांती कशी लागू शकते याविषयी ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये देण्यात येणारा राजयोग मेडिटेशन कोर्स आपण सर्वांनी अवश्य करावा असे आवाहन याप्रसंगी बी के दिलीप बोरसे यांनी केले. सोबतच आपल्या आगारात ज्याप्रमाणे इतर सुविधा असतात त्याचप्रमाणे मेडिटेशन रूम सुद्धा असावा असा विचार बी के दिलीप बोरसे यांनी प्रस्तुत केला, यास आगार व्यवस्थापनाने सहर्षाने मान्य केले.
कार्यक्रमात वीस वर्ष विना अपघात सेवा देणारे कैलास तुपे व श्री.संजय तुकाराम, यु एल टर्ले, एस डी परिहार यांचा सत्कार ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी जी यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुनम देशमुख(सहायक वाहतूक अधीक्षक, राप नाशिक) यांनी केले
आभार प्रदर्शन श्री. दादाजी महाजन (वरिष्ठ आगार व्यवस्थापक,नाशिक यांनी केले.
कार्यक्रमात मोठ्या संख्येने आगारातील चालक, वाहक व कर्मचारी वृंद आणि अधिकारी वर्ग उपस्थित होते.
ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी व विणा दीदी यांनी विभाग नियंत्रक अरुण सिया यांना ईश्वरी भेटवस्तू देऊन सत्कार केले.