ब्रह्माकुमारी तर्फे त्र्यंबकेश्वर येथे साकारणार अध्यात्मिक म्युझियम
त्र्यंबकेश्वर - पेगलवाडी येथे नाशिक सेवा केंद्र तर्फे नुकतेच अध्यात्मिक म्युझियम साकारण्यासाठी जमिन विकत घेण्यात आली. ब्रह्माकुमारी संस्थेच्या संयुक्त मुख्य प्रशासिका आदरणीय संतोष दादीजी यांच्या दिव्य उपस्थितीत पेगलवाडी येथील या जागेवर शिव ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती शांताराम मुळाणे व पत्रकार ज्ञानेश्वर मेढे हे उपस्थित होते. मुख्य सेवा केंद्र मुख्य संचालिका ब्रह्माकुमारी वासंती दिदिजी यांनी स्वागत संबोधन केले.
या ठिकाणाचे वातावरणच इतके अल्हाददायक आहे की येथे आल्यावर प्रत्येकाचे सहजतेने ध्यान लागू शकेल अशा या निसर्गसंपदेने नटलेल्या ठिकाणी जनतेची आध्यात्मिक सेवे सोबतच साधकाची आत्मिक उन्नती सुद्धा साधली जाईल असे प्रतिपादन आदरणीय संतोष दादीजी यांनी केले.
या आध्यात्मिक म्युझियमचां लाभ त्रंबकेश्वर सहित आजूबाजूच्या गावांना तर होणारच आहे, सोबतच येथे येणाऱ्या भाविकांनाही या म्युझियम मधून आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होणार आहे. देशातच नव्हे तर विश्वामध्ये अध्यात्मिक जागृती करणारे हे केंद्र ठरेल असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांनी केले
याप्रसंगी विविध सेवा केंद्र मधून सरला दीदी, गोदावरी दीदी, शक्ती दीदी, विना दीदी, मनीषा दीदी, विनू दीदी, पुष्पा दीदी मंगल दीदी, चंदा दीदी आदी समर्पित भगिनी व्यासपीठावर उपस्थित होत्या. सूत्रसंचालन पूनम दीदी यांनी केले