आनंदवलीच्या सहाय्यक शिक्षिका कुंदा बच्छाव यांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मान
‘ज्ञानाच्या भिंती’, ‘मिशन मोबाईल फ्री’ आणि ‘शैक्षणिक पालकत्व’च्या माध्यमातून शिक्षणाची नवी वाट
नाशिक : आनंदवली येथील मनपा स्कूल क्रमांक १८च्या सहाय्यक शिक्षिका कुंदा जयवंत बच्छाव यांची प्रतिष्ठित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ साठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांना केवळ वर्गखोलीपुरते शिक्षण न देता परिसरालाच ज्ञानाचे माध्यम बनविणाऱ्या त्यांच्या अभिनव शैक्षणिक कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. ५ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
कुंदा बच्छाव यांनी आनंदवली परिसरात ‘ज्ञानाच्या भिंती’ हा अभिनव उपक्रम राबवून ३० हून अधिक भिंतींचे रूपांतर रंगीबेरंगी ज्ञानफलकांमध्ये केले. या भिंतींवर विविध नकाशे, गणितीय समीकरणे, शॉर्टकट युक्त्या, इंग्रजीतील अवघड शब्द, सामान्यज्ञान तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला उपयुक्त माहिती साकारण्यात आली. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करतानाही विद्यार्थ्यांना सहज, आनंददायी आणि खेळकर पद्धतीने नवे ज्ञान मिळू लागले.
विद्यार्थ्यांचा वाढता स्क्रीन टाईम लक्षात घेऊन त्यांनी ‘मिशन मोबाईल फ्री’ हा उपक्रमही सुरू केला. विद्यार्थ्यांच्या घरांच्या भिंतींवर सुविचार, सामान्यज्ञान, कोडी आणि शैक्षणिक माहिती साकारण्यात आली. मोबाईलपासून विद्यार्थ्यांचे लक्ष दूर करून वाचन आणि ज्ञानाची आवड निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने बच्छाव यांनी आनंदवली परिसरातील मंदिर तसेच संत कबीर वस्तीच्या सामुदायिक केंद्रात सार्वजनिक वाचनालय सुरू केले. मंदिरात येणाऱ्या नागरिकांसोबतच विद्यार्थ्यांनाही या वाचनालयाचा लाभ मिळू लागला. शिक्षण हे केवळ शाळेच्या चार भिंतींमध्ये मर्यादित न राहता समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावे, हा त्यांच्या कार्यामागील विचार आहे.
त्यांच्या ‘शैक्षणिक पालकत्व’ या उपक्रमातून समाजातून वर्गणी आणि मदत गोळा करून शंभरहून अधिक गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली. या मदतीमुळे अनेक विद्यार्थी सीए, इंजिनिअरिंग, बी.कॉम., एमपीएससी, आयटीआय यांसारख्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत आहेत.
बच्छाव यांनी STEM अर्थात विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांच्या शिक्षणावरही विशेष भर दिला. त्यांच्या अभिनव उपक्रमाला महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धेत राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार मिळाला. त्यातून मिळालेली एक लाख रुपयांची शरद पवार फेलोशिपची रक्कमही त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केली. याशिवाय शालेय विद्यार्थ्यांना
जर्मन आणि स्पॅनिश यांसारख्या विदेशी भाषांची ओळख करून देण्याचे कामही त्यांनी केले.
डिजिटल शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. त्यांच्या कार्याची नोंद एनसीईआरटीच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजीच्या अधिकृत नोंदींमध्ये करण्यात आली आहे. तसेच डिजिटल शिक्षणाशी संबंधित विविध विषयांवर त्या रिसोर्स पर्सन म्हणूनही कार्यरत राहिल्या आहेत.
दोन दशकांहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या कुंदा बच्छाव यांच्या कार्याची यापूर्वीही दखल घेण्यात आली असून २०२३ मध्ये त्यांना राज्य शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण, तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर, वाचनसंस्कृती, आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना आधार आणि समाजाच्या सहभागातून शैक्षणिक विकास या विविध उपक्रमांमधून त्यांनी शिक्षकाची भूमिका वर्गखोलीच्या पलीकडे नेली आहे. त्यांच्या या कार्यामुळे आनंदवलीसह नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्राला राष्ट्रीय स्तरावर गौरव प्राप्त झाला आहे.
ज्ञानाची ज्योत पेटविणाऱ्या, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देणाऱ्या आणि शिक्षणाला समाजाशी जोडणाऱ्या आदर्श शिक्षिका कुंदा जयवंत बच्छाव यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांनी आनंदवलीचा शैक्षणिक नावलौकिक देशभर पोहोचविला आहे. आपल्या समर्पणाला मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान म्हणजे नाशिकच्या शिक्षण क्षेत्राचा गौरव आहे.
आपल्या कार्याला मनःपूर्वक सलाम! भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 💐 — साप्ताहिक नाशिक परिसर परिवार


