शिवानी दीदींच्या मराठवाडा सेवायात्रेचा नवा विक्रम; पाच शहरांत ७५ हजारांहून अधिक नागरिकांनी घेतला प्रवचनांचा लाभ
ऑनलाइन प्रसारणातून २ लाखांहून अधिक लोकांपर्यंत आध्यात्मिक संदेश; मोबाईलचा विवेकी वापर, जलसंवर्धन, मनोबल आणि सकारात्मक जीवनशैलीचे दिले मार्गदर्शन
मराठवाडा : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वरिष्ठ राजयोग शिक्षिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांची मराठवाडा सेवायात्रा आध्यात्मिक जागृती, सकारात्मक विचार आणि जीवनपरिवर्तनाच्या दृष्टीने अत्यंत प्रेरणादायी ठरली. या सेवायात्रेदरम्यान जालना, परभणी, नांदेड, लातूर आणि सोलापूर या पाच शहरांमध्ये आयोजित सार्वजनिक प्रवचनांचा ७५ हजारांहून अधिक नागरिकांनी प्रत्यक्ष लाभ घेतला. तर ऑनलाइन लाइव्ह प्रसारणाच्या माध्यमातून २ लाखांहून अधिक लोकांपर्यंत आध्यात्मिक विचारांचा संदेश पोहोचला.
या सेवायात्रेत ‘खुशी से दोस्ती, तनाव से मुक्ति’, ‘खुशी का पासवर्ड’, ‘खुशनुमा जीवन जीने की कला’, ‘रिचार्ज युअर लाइफ’ आणि ‘सरल मन, शांत जीवन’ अशा विषयांद्वारे आनंदी, तणावमुक्त, सकारात्मक आणि मूल्याधिष्ठित जीवन जगण्याची दिशा देण्यात आली.
मोबाईलच्या वापरावर नियंत्रण ते दिव्य जीवनशैलीचा स्वीकार
सध्याच्या डिजिटल युगातील आव्हानांवर भाष्य करताना शिवानी दीदी यांनी मोबाईल आणि डिजिटल माध्यमांचा विवेकपूर्ण वापर करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. मोबाईलचा वापर आपल्या गरजेनुसार व्हावा; आपण मोबाईलच्या आहारी जाऊ नये, असा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी दिला. खरे नियंत्रण मोबाईलवर नव्हे, तर स्वतःच्या मनावर आणि विचारांवर असणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
जीवनशैली अधिक दिव्य, श्रेष्ठ आणि सकारात्मक बनविण्यासाठी आत्मिक जागरूकता, शुद्ध संकल्प आणि श्रेष्ठ कर्मांची आवश्यकता त्यांनी विशद केली. दृढ निश्चय, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या माध्यमातून संकल्पाचे सिद्धीमध्ये रूपांतर करता येते, असा प्रेरणादायी संदेशही त्यांनी दिला.
जलसंकटावर मात करण्यासाठी सामूहिक संकल्पाची गरज
जलसंकटासारख्या गंभीर सामाजिक आणि पर्यावरणीय समस्येकडेही शिवानी दीदी यांनी विशेष लक्ष वेधले. जलसंवर्धन ही केवळ शासन किंवा प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व ओळखून पाण्याचा अपव्यय टाळणे, जागरूकता निर्माण करणे आणि दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडविणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीने जलसंवर्धनाचा दृढ संकल्प केल्यास सामूहिक प्रयत्नांतून मोठे परिवर्तन घडू शकते, असे त्यांनी सांगितले.
मनोबल वाढविण्यासाठी राजयोग मेडिटेशन महत्त्वाचा आधारस्तंभ
मानसिक शांतता, आत्मविश्वास आणि मनोबल वृद्धिंगत करण्यासाठी राजयोग मेडिटेशन हा महत्त्वपूर्ण आधारस्तंभ असल्याचे शिवानी दीदी यांनी सांगितले. राजयोगाच्या नियमित अभ्यासामुळे विचारांना सकारात्मक दिशा मिळते, मनाची शक्ती वाढते आणि प्रतिकूल परिस्थितीतही मानसिक संतुलन राखण्याची क्षमता विकसित होते. आत्मिक शक्तीची जाणीव आणि सकारात्मक दृष्टिकोन यांमुळे जीवनातील आव्हानांना सामोरे जाणे अधिक सुलभ होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
५५० किलोमीटरहून अधिक प्रवासातून व्यापक जनजागृती
या सेवायात्रेदरम्यान पाच शहरांमध्ये ५५० किलोमीटरहून अधिक प्रवास करण्यात आला. विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ७५ हजारांहून अधिक नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. याशिवाय १० हजारांहून अधिक नागरिकांनी राजयोग मेडिटेशन शिबिरांच्या माध्यमातून ध्यानाचा अनुभव घेतला. ऑनलाइन लाइव्ह प्रसारणामुळे या सेवाकार्याचा विस्तार अधिक व्यापक झाला.
प्रवचनांनंतर तीन दिवसीय राजयोग मेडिटेशन शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद
शिवानी दीदी यांच्या प्रवचनांनंतर विविध शहरांमध्ये तीन दिवसीय राजयोग मेडिटेशन आणि जीवनपरिवर्तन शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये वेदात्री दीदी, रश्मी दीदी, शक्तिराज भाई, सविता दीदी आणि दामिनी दीदी यांच्यासह अनुभवी राजयोग शिक्षिकांनी व शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
या शिबिरांमध्ये आत्मिक शांती, सकारात्मक चिंतन, तणाव व्यवस्थापन, मनाची एकाग्रता आणि राजयोग मेडिटेशनचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला. नागरिकांनी या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी आध्यात्मिक संवाद
सेवायात्रेदरम्यान विविध शहरांमध्ये लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, मान्यवर आणि विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्तींचीही भेट घेण्यात आली. त्यांना आध्यात्मिक जीवनशैली, मानसिक शांतता, सकारात्मक विचार आणि मूल्याधिष्ठित जीवनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
सामूहिक पुरुषार्थातून सेवायात्रा यशस्वी
मर्यादित वेळ आणि व्यस्त कार्यक्रम असूनही शिवानी दीदी यांनी आपल्या सहज हास्याने, प्रभावी वक्तृत्वाने आणि आध्यात्मिक ऊर्जेने हजारो नागरिकांच्या मनाला स्पर्श केला. आत्मिक शांती, सकारात्मक दृष्टिकोन, नातेसंबंधांमधील मधुरता आणि तणावमुक्त जीवनशैली यांचे महत्त्व त्यांनी अत्यंत सोप्या व प्रभावी पद्धतीने समजावून सांगितले.
या व्यापक सेवायात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी मराठवाड्यातील विविध ब्रह्माकुमारी सेवा केंद्रांचे समर्पित बंधू-भगिनी, स्थानिक आयोजक, स्वयंसेवक आणि सर्व सहकाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. ही सेवायात्रा केवळ प्रवचनमालिका न ठरता, प्रत्येक व्यक्तीला स्वतःशी जोडणारी, अंतर्मनातील शक्ती ओळखण्यास प्रेरित करणारी आणि वैयक्तिक तसेच सामाजिक जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रेरणा देणारी आध्यात्मिक जनजागृती चळवळ ठरली.





