ज्याच्या जीवनात कृतज्ञता असते, त्याच्या जीवनात परमात्म्याची कृपा सतत अनुभवास येते.
जीवनात काही दिवस असे असतात, जे फक्त दिनदर्शिकेतील तारखा नसतात, तर संपूर्ण आयुष्याला नवी दिशा देणारे टप्पे ठरतात.माझ्यासाठी दि. ६ जुलै १९९५ हा असाच एक अविस्मरणीय दिवस आहे.या दिवशी माझ्या शैक्षणिक सेवेला ३१ वर्षे पूर्ण झाली.हा प्रवास केवळ नोकरीचा नाही, तर ज्ञानदान, संस्कार, समाजसेवा आणि ईश्वरीय सेवेला वाहिलेल्या आयुष्याचा आहे.
माझे मूळ गाव मांजरगाव, ता. निफाड, जि. नाशिक. त्या दिवशी माझे पूज्य वडील स्व. तात्या यांच्यासमवेत मी गंगापूर येथे आलो. मनात अनेक स्वप्ने, थोडी भीती आणि प्रचंड उत्साह होता. ज्ञान साधना शिक्षण प्रसारक संस्थेच्या दे.ना.पाटील माध्यमिक विद्यालय व ज्यु. कॉलेज,गंगापूर येथे एस.एस. सी.डी.एड.स्केलवर उपशिक्षक म्हणून रुजू होण्याचे भाग्य मला लाभले.त्या वेळी विद्यालयाचे प्राचार्य होते नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे संस्थापक अध्यक्ष,शिक्षणमहर्षी,आदर्श, शिस्तप्रिय,दूरदृष्टीचे व्यक्तिमत्त्व, “न भूतो न भविष्यती” असे परमपूज्य स्वर्गीय पो. गो. शिरसाट.त्यांच्याकडून मी शिस्त, वेळेचे महत्त्व, विद्यार्थ्यांवरील प्रेम, प्रामाणिकपणा आणि शिक्षकाचे खरे कर्तव्य शिकलो. ते माझ्यासाठी केवळ प्राचार्य नव्हते, तर गुरुवर्य आणि प्रेरणास्थान होते.त्याचप्रमाणे आदर्श उपक्रमशील शिक्षक स्व. लक्ष्मण कन्नोर,आदर्श प्राचार्य स्व. विक्रम बच्छाव तसेच त्याकाळातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर.पी.निकम,टिकमदास बैरागी तसेच सर्व ज्येष्ठ शिक्षक,शिक्षकेतर सहकारी बंधू-भगिनी यांच्याकडून मला प्रेम,मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले. आज त्या सर्वांविषयी मनात अपार आदर आणि कृतज्ञता आहे.
शिक्षक म्हणून कार्य करताना हजारो विद्यार्थ्यांना शिकविण्याचे भाग्य लाभले.अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत, हीच माझ्या शिक्षक जीवनाची खरी कमाई आहे. शिक्षक म्हणून केवळ अभ्यासक्रम शिकविणे नव्हे, तर विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, देशप्रेम, समाजसेवा आणि माणुसकीची मूल्ये रुजविण्याचा मी सातत्याने प्रयत्न केला.आज मी मातोश्री गीताबाई देवराम पाटील माध्यमिक विद्यालय, महिरावणी येथे बी.एड.स्केलवर कार्यरत आहे. या विद्यालयातील सेवानिवृत मुख्याध्यापक अशोक भदाणे तसेच सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर सहकारी बंधू-भगिनी आणि विद्यार्थ्यांचे मला नेहमीच प्रेम, विश्वास आणि सहकार्य लाभले.त्यांच्या सहकार्यामुळेच माझ्या कार्याला अधिक बळ मिळाले. त्याबद्दल मी सर्वांचा मनःपूर्वक ऋणी आहे.
माझ्या जीवनाला योग्य दिशा देण्यात माझ्या गुरुजनांचे योगदान अनमोल आहे. प्राथमिक शिक्षणापासूनच मला संस्कार, शिस्त, प्रामाणिकपणा आणि जीवनमूल्ये शिकविणारे प.पू. स्व. कणसेगुरुजी आणि प.पू. गायकवाडगुरुजी यांचे ऋण मी कधीही विसरू शकणार नाही. त्यानंतर माध्यमिक शिक्षणात प.पू. स्व. रामचंद्र राऊत, सेवानिवृत्त प्राचार्य आनंदराव कुटे,स्व. व्ही. एम. शिंदे, स्व.उगलेसर,स्व. कानडीसर, स्व. वसंतराव सांगळे,स्वर्गीय करपे सर तसेच एल. डी. आवारे सर,अशोक शिंदे,दुबेसर,गावलेसर,आरोटेसर, फडसर,डेर्लेसर व मॅडम, निकुंभ(भदाणे)मॅडम या सर्व गुरुजनांनी मला केवळ पुस्तकातील शिक्षण दिले नाही, तर चांगला माणूस म्हणून जगण्याचे संस्कार दिले. त्यांच्या शिकवणीमुळेच आज मी समाजात जे काही कार्य करू शकलो, त्यामागे त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन आहे. त्या सर्व गुरुजनांप्रती मी सदैव कृतज्ञ आहे.
जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर जिवाभावाचे मित्र आणि प्रेमळ नातेवाईक यांची साथही मला लाभली. बालपणापासून आजपर्यंत संदीप सानप, सोमनाथ सोनवणे (अध्यक्ष), संजय सोनवणे,श्रीकृष्ण सोनवणे, वसंत सोनवणे,सुनील सोनवणे,प्रकाश साळवे,रवींद्र वाळिबा सोनवणे,योगेश जोशी,ज्ञानेश्वर सोनवणे,राजेंद्र आव्हाड,जगन डोईफोडे,रमेश व दत्तू आघाव,लहानू फडोळ,बंडू वडनेरे,शांताराम शिंदे,नवनाथ डुकरे,कृष्णा नवले,विलास जाधव आणि मोहन माळी हे माझे जिवाभावाचे मित्र प्रत्येक सुख-दुःखात खंबीरपणे सोबत उभे राहिले. त्यांचे प्रेम, विश्वास आणि मैत्री ही माझ्या जीवनातील मोठी संपत्ती आहे.तसेच मांजरगाव येथील भास्करशेठ सोनवणे(मामा)व परिवार, चापडगाव (ता. निफाड) येथील आईचे सर्व मामा,मामी,सर्व मामेभाऊ आणि दराडे परिवार,तसेच डोंगरगाव येथील माझे सासरे रामनाथमामा सांगळे व त्यांचा संपूर्ण परिवार,नांदगाव येथील मुरलीधर मामा महाजन आणि भास्कर मामा महाजन यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला प्रत्येक प्रसंगी प्रेम,आधार आणि आपुलकी दिली.त्यांच्या सहकार्यामुळे जीवनातील अनेक कठीण प्रसंग सहज पार करता आले.या सर्वांविषयी माझ्या मनात सदैव आदर, प्रेम आणि कृतज्ञतेची भावना राहील.माझे चुलते तुळशीरामनाना,रामनाथनाना,नवनाथनाना,दामुतात्या,सोमातात्या, शरदनाना आदींसह इतर सर्व चुलते, चुलत भाऊ, चुलत बहिणी आणि संपूर्ण सोनवणे परिवाराचे प्रेम, आशीर्वाद व सहकार्य मला प्रत्येक टप्प्यावर लाभले. त्यांच्या आपुलकी,एकोप्यामुळे आणि जिव्हाळ्यामुळे नात्यांची खरी ऊब अनुभवता आली,त्याबद्दल मी संपूर्ण सोनवणे परिवाराचा सदैव ऋणी आणि कृतज्ञ आहे.
माझ्या वैयक्तिक जीवनाकडे पाहिले तर आमच्या कुटुंबात आम्ही तीन भाऊ आणि दोन बहिणी.मी सर्वात मोठा. माझा लाडका भाऊ स्वर्गीय चिंतामण अडीच वर्षांपूर्वी आम्हाला सोडून गेला. त्याच्या आठवणी आजही मनाला हेलावून टाकतात. माझा धाकटा भाऊ रामदास, तसेच माझ्या बहिणी सौ. वंदना प्रभाकर दराडे आणि सौ. सुरेखा बापू सांगळे यांचे प्रेम, स्नेह आणि सहकार्य मला नेहमीच प्रेरणा देत आले आहे. लहानपणापासून पोलिओमुळे माझा डावा हात दिव्यांग आहे. पण परमेश्वराने मनाला कधीही दिव्यांग होऊ दिले नाही. प्रत्येक अडचणीतून मार्ग काढण्याची शक्ती दिली. आमचे वडील स्व.तात्या सुमारे २५ वर्षांपूर्वी आम्हाला सोडून गेले, परंतु त्यांचे कष्ट, प्रामाणिकपणा आणि स्वाभिमानाचे संस्कार आजही माझ्या जीवनाचा आधार आहेत.
माझ्या जीवनातील सर्वात मोठी प्रेरणा म्हणजे माझी आई म्हणजे आमची “अक्का”. कष्ट, त्याग, माया आणि संस्कार यांचे मूर्तिमंत रूप म्हणजे आमची अक्का. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही तिने आम्हा तीन भाऊ आणि दोन बहिणींचे प्रेमाने संगोपन केले, शिक्षण दिले आणि चांगले संस्कार दिले. तिच्या कष्टांना, त्यागाला आणि मायेच्या ऋणाला कधीच पार नाही. आईचे उपकार आयुष्यभर फेडता येत नाहीत, ते फक्त कृतज्ञतेने स्मरणात ठेवता येतात.आजही मी कितीही मोठा झालो,कितीही जबाबदाऱ्या सांभाळत असलो तरी तिच्या मनात माझी काळजी तितकीच आहे.तिचे आशीर्वाद,तिची माया आणि तिच्या प्रार्थनाच माझ्या जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहेत. शिव परमात्म्याने माझ्या अक्काला निरोगी, आनंदी आणि दीर्घायुष्य लाभावे, हीच रोज शिवबाबांकडे प्रार्थना! आईवडिलांनंतर माझ्या आयुष्याची मोठी शक्ती म्हणजे माझी धर्मपत्नी सौ. सुनीता. ती माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थाने “डावा हात” बनून उभी राहिली.प्रत्येक संकटात, प्रत्येक संघर्षात,प्रत्येक यशात तिने माझी निःस्वार्थ साथ दिली.तिच्या सहकार्याशिवाय माझा हा प्रवास इतका यशस्वी झाला नसता.माझे दोन्ही सुपुत्र चि.शुभम आणि चि.ओंकार शिक्षण घेत आहेत.त्यांनीही उत्तम संस्कार, समाजसेवा आणि अध्यात्माची वाट स्वीकारावी, हीच माझी अपेक्षा आहे. माझा लहान भाऊ स्व.चिंतामण यांची मुले चि. साई आणि कु. शुभांगी, तसेच माझा लहान भाऊ रामदास यांच्या श्रद्धा, श्रेया आणि श्रावणी या कन्या तसेच भाचे भैय्या, कृष्णा,ईश्वर आणि भाची गायत्री,जुही, साक्षी तसेच नातू चि.मल्हार सानप आमच्या कुटुंबाचा आनंद आणि भविष्याची आशा आहेत. शिवबाबांच्या कृपेने त्यांनी उत्तम शिक्षण, उच्च संस्कार, निरोगी आयुष्य लाभून समाजसेवा व राष्ट्रसेवेच्या मार्गावर यशस्वी वाटचाल करावी, हीच मनःपूर्वक प्रार्थना!
माझ्या जीवनाला खरी कलाटणी मिळाली ती प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या सहवासामुळे. नाशिक जिल्ह्याच्या मुख्य संचालिका प.पू. राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी आणि वरिष्ठ राजयोग शिक्षिका प.पू.राजयोगिनी ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांच्या स्नेहपूर्ण मार्गदर्शनामुळे माझ्या विचारांत,स्वभावात आणि जीवनदृष्टीत मोठा सकारात्मक बदल झाला.शिवबाबांच्या ज्ञानामुळे जीवन अधिक शांत, समाधानी आणि सेवामय झाले.
माझ्या समाजसेवेच्या प्रवासाला नवी दिशा मिळाली ती सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी. महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे संस्थापक आदरणीय दिगंबर घाडगे पाटील यांची भेट झाली आणि त्यांच्या प्रेरणेने दिव्यांग बांधवांच्या सेवाकार्यात सहभागी होण्याची संधी मिळाली. सुरुवातीला महासंघाच्या माध्यमातून आणि सन २००५ पासून महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून दिव्यांगांच्या हक्कांसाठी, पुनर्वसनासाठी आणि विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने कार्य करत राहिलो. शिवबाबांच्या कृपेने, आदरणीय दिगंबर घाडगे पाटील यांचे मार्गदर्शन, संघटनेतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दिव्यांग बांधवांचा विश्वास व प्रेम यामुळे आज मला महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेच्या राज्याध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्याचे भाग्य लाभले. हे पद माझ्यासाठी6 सन्मानाचे नसून, दिव्यांग बांधवांची निःस्वार्थ सेवा करण्याची ईश्वरीय संधी आणि पवित्र जबाबदारी आहे.
संत तुकाराम महाराज म्हणतात की,
जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले ।
तोचि साधू ओळखावा । देव तेथेंचि जाणावा ॥
याच विचाराने शिक्षणसेवा, दिव्यांग सेवा आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम घडवत राहणे,हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे.
३१ वर्षांच्या या सेवाप्रवासाकडे मागे वळून पाहताना एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते की,हे माझे कर्तृत्व नसून, गुरूजनांचे संस्कार, आई-वडिलांचे आशीर्वाद, पत्नी व कुटुंबाचे प्रेम, नातेवाईकांचे सहकार्य, मित्रांचा विश्वास, सहकारी शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक, दिव्यांग बांधव, संघटनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे पाठबळ तसेच परमपिता शिवबाबांची कृपा यांचेच हे सुंदर फळ आहे. या सर्वांविषयी माझ्या मनात सदैव कृतज्ञतेची भावना राहील.
या पवित्र क्षणी मी परमपिता परमात्मा शिवबाबांकडे एकच प्रार्थना करतो की,माझ्या हातून शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानदान, समाजसेवा, दिव्यांग सेवा आणि अध्यात्माची सेवा घडत राहो. माझ्या आईवर पत्नी सुनीता,मुले शुभम व ओंकार, भाऊ रामदास, बहिणी वंदना आणि सुरेखा,संपूर्ण सोनवणे परिवारावर सर्व गुरुवर्य, सहकारी, विद्यार्थी, मित्रपरिवार आणि समाजावर शिवबाबांचा कृपाआशीर्वाद सदैव राहो! मला नेहमी नम्रता, सेवाभाव आणि कर्तव्यनिष्ठा जपण्याची शक्ती मिळो.
शेवटी एवढेच…
कर्तृत्व माझे नाही, कृपा तुझी आहे
सेवा माझी नाही, संधी तुझी आहे.
पाऊलोपाऊली हात धरून चालविणारा
माझा शिव परमात्मा शिवबाबाच माझा खरा आधार आहे.
ओम् शांती!
शब्दांकन:-
बाळासाहेब दादा सोनवणे सर
(मांजरगाव,ता.निफाड,जि. नाशिक)
उपशिक्षक, मातोश्री गिताबाई देवराम पाटील माध्यमिक विद्यालय महिरावणी, ता. जि.नाशिक
राज्याध्यक्ष,महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना
जिल्हा समन्वयक, डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन, रामेश्वरम राज्य तामिळनाडू,नाशिक जिल्हा
मोबा.नं.8055370977
ई मेल – baludadasonawane97@gmail.com

