नाशिक रोड : व्यसनमुक्त जीवनासाठी केवळ इच्छाशक्ती पुरेशी नसून आत्मनियंत्रण आणि अध्यात्मिक दृष्टिकोन विकसित होणे गरजेचे आहे. व्यक्तीमध्ये स्व-नियंत्रणाचा अभाव निर्माण झाला की ती हळूहळू व्यसनाच्या आहारी जाते. स्वतःला योग्य प्रकारे जाणून घेण्यासाठी ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे साप्ताहिक राजयोग मेडिटेशन कोर्स आयोजित केला जातो. या कोर्सच्या माध्यमातून जीवन उन्नत करण्याबरोबरच व्यसन, ताणतणाव आणि विविध विकारांपासून मुक्त होण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येकाने ब्रह्माकुमारी संस्थेचा साप्ताहिक राजयोग मेडिटेशन कोर्स करावा, असे प्रतिपादन ब्रह्माकुमार दिलीप भाई यांनी केले.
दुर्गा माता ज्येष्ठ नागरिक संघ, जेलरोड येथे ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे आयोजित ‘दहा कोटी व्यसनमुक्ती प्रतिज्ञा’ कार्यक्रमात ते मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक तथा ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष शैलेश ढगे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश डहाळे होते.

यावेळी मार्गदर्शन करताना शैलेश ढगे यांनी ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या जीवनात विविध छंद जोपासण्याचे आवाहन केले. छंदांमध्ये मन रमल्याने वेळेचा सदुपयोग होतो आणि व्यसनापासून दूर राहण्यास मदत होते. तसेच या वयात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात रमेश डहाळे यांनी व्यसनाधीनतेच्या विविध कारणांवर प्रकाश टाकला. एकेकाळी नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत केलेल्या कार्याचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, व्यसन सुरुवातीला गंमत किंवा कुतूहल म्हणून सुरू होते; मात्र कालांतराने व्यक्ती त्याच्या आहारी जाते. वाईट संगत, प्रतिष्ठेच्या नावाखाली केले जाणारे व्यसन तसेच अज्ञान यामुळे व्यसनाधीनता वाढते. आवडणारा पदार्थ पोटभर खाल्ल्यानंतर त्याची गरज संपते; परंतु व्यसनामध्ये तृप्ती होत नाही. कितीही सेवन केले तरी पुन्हा त्याची इच्छा निर्माण होत राहते, असे त्यांनी स्पष्ट केले.

नाशिक रोड सेवा केंद्राच्या ब्रह्माकुमारी गोदावरी दीदीजी यांच्या प्रेरणेने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. ब्रह्माकुमार दिलीप भाई यांचे स्वागत व सत्कार नगरसेवक शैलेश ढगे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन संघाचे सचिव भीमराव चव्हाण यांनी केले.

