*विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा*
नाशिक रोड – (दि. ८ ऑगस्ट) : येथील ब्रह्माकुमारी सेवा केंद्रातर्फे, ब्रह्माकुमारी संस्थेच्या राजयोग एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन अंतर्गत सुरू असलेल्या ‘१० कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियाना’ अंतर्गत श्री जयराम हायस्कूल व के. जे. मेहता हायस्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती जनजागृती व प्रतिज्ञा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ब्रह्माकुमार दिलीप भाऊ बोरसे, ब्रह्माकुमारी सुधामाता लोटणकर व ब्रह्माकुमारी विजया माता कुलकर्णी सहभागी झाले.


यावेळी ब्रह्माकुमार दिलीप भाऊ बोरसे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम मिश्कील व उपरोधिक उदाहरणांतून समजावून सांगितले. व्यसनाधीन व्यक्तीच्या घरात चोरी होत नाही, कारण त्याने विकण्यासारखे काही शिल्लक ठेवलेले नसते; व्यसनी व्यक्ती म्हातारी होत नाही, कारण व्यसनामुळे त्याचे आयुष्यच धोक्यात येते. तसेच व्यसनी व्यक्ती कधी व्यसनमुक्ती केंद्रात, कधी रुग्णालयात तर कधी तुरुंगात आढळते, अशा उदाहरणांतून त्यांनी व्यसन ही व्यक्ती, कुटुंब आणि समाजाला पोखरणारी कीड असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहावे आणि इतरांनाही व्यसनमुक्त जीवनासाठी प्रेरित करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांकडून नशामुक्तीची प्रतिज्ञा घेण्यात आली.


ब्रह्माकुमारी सुधामाता लोटणकर यांनी ब्रह्माकुमारी संस्थेच्या कार्याची व ‘१० कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियाना’ची माहिती दिली. राजयोग ध्यानामुळे मनाची शक्ती, आत्मविश्वास व सकारात्मक विचार वाढण्यास मदत होते, असे सांगून विद्यार्थ्यांनी निरोगी व व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन केले. ब्रह्माकुमारी विजया माता कुलकर्णी यांनीही विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश दिला.


श्री जयराम हायस्कूल
श्री जयराम हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमास श्री
तुषार खांडबहाले, सुभाष घेवारे, भूषण कापुरे, श्री संजय चौधरी, पर्यवेक्षक श्री सुनील बोरसे यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते.
के. जे. मेहता हायस्कूल
के. जे. मेहता हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमास मुख्याध्यापक वसंत गायकवाड, दिलीप गायकवाड, सुनील पाटील यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत व्यसनमुक्त जीवनाचा संकल्प केला.
कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी यांनी केले.

