राजयोगामुळे जीवनात सकारात्मकता व तणावमुक्ती शक्य – ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी
ग्राहकांचे आशीर्वाद हीच आमची खरी कमाई – सोमेश्वर काबरा



नाशिकरोड : येथील ब्रह्माकुमारी संस्थेच्या सभागृहात साप्ताहिक नाशिक परिसर व काबरा एम्पोरियम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘काबरा प्रश्नमंजुषा’ स्पर्धेचा बक्षीस वितरण व सोडत समारंभ मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. कार्यक्रमास महिला स्पर्धकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी, ब्रह्माकुमारी शक्ती दीदी, काबरा एम्पोरियमचे संचालक सोमेश्वर काबरा, साप्ताहिक नाशिक परिसरचे संपादक ब्रह्माकुमार दिलीप बोरसे, काबरा एम्पोरियमच्या सून सुधा काबरा तसेच काबरा एम्पोरियमच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे कुशल काबरा सपत्नीक उपस्थित होते.


प्रमुख अतिथी सोमेश्वर काबरा यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “पुस्तक लेखन करत असताना माझ्या मनात कोणतीही इच्छा ठेवायची नाही, कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा ठेवायची नाही, कोणाकडून काही घ्यायचे नाही आणि कोणत्याही मान-सन्मानाची अपेक्षा करायची नाही, असा मी निश्चय केला. हा प्रयोग माझ्या जीवनात उतरवल्यानंतर मी अधिक आनंदाने पुस्तक लेखन करू लागलो.” ते पुढे म्हणाले, “आज समाजात सर्वजण पैसे कमावण्यामागे धावत आहेत. मात्र आमचा उद्देश पैसा कमावणे नसून ग्राहकांचे आशीर्वाद कमावणे हा आहे. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसे तुटत नाहीत. जीवनात आपल्याला कोण भेटेल हे वेळ ठरवते, पण आपण कोणाला भेटावे हे आपले हृदय ठरवते आणि आपण कोणाच्या हृदयात राहतो हे आपला व्यवहार ठरवत असतो.”
ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी यांनी राजयोग मेडिटेशनचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, “हे शरीर म्हणजे एक गाडी असून आत्मा हा तिचा चालक आहे. आपण ज्या ठिकाणी कपाळावर टिळा किंवा टिकली लावतो, त्या ठिकाणी आत्म्याचे स्थान आहे. मन, बुद्धी आणि संस्कार ही आत्म्याची तीन शक्ती आहेत. मनात निर्माण होणाऱ्या असंख्य विचारांमुळे तणाव निर्माण होतो. या विचारांचे योग्य व्यवस्थापन करून आत्मस्वरूपाची जाणीव करून देणारे राजयोग मेडिटेशन प्रत्येकासाठी आवश्यक आहे.”



यावेळी ब्रह्माकुमार दिलीप बोरसे यांनी सांगितले की, “सकाळपासून रात्रीपर्यंत आपण शारीरिक कार्यांमध्येच व्यस्त असतो; मात्र आत्मिक उन्नतीसाठी वेळ देत नाही. आपण दिवसभर ‘मी’च्या अभिमानात जगत असतो. ‘रावण को मैने नही मारा… रावण को मै ने मारा…’ या वाक्यातील ‘मैं’ म्हणजेच अहंकार होय. या शारीरिक अहंकारापासून मुक्त होण्यासाठी ब्रह्माकुमारी संस्थेमार्फत शिकविले जाणारे राजयोग मेडिटेशन प्रत्येकाने शिकणे ही काळाची गरज आहे. आजच्या तणावपूर्ण जीवनात राजयोगामुळे सुख, शांती आणि आत्मबल निश्चितच प्राप्त होऊ शकते.”
यानंतर प्रश्नमंजुषेतील सर्व अचूक प्रवेशिकांमधून पारदर्शक पद्धतीने सोडत काढण्यात आली.
मुख्य विजेते…
🥇 प्रथम बक्षीस (₹३,१००) – सुरेखा प्रदीप शहाणे (कोड क्र. १८९)
🥈 द्वितीय बक्षीस (₹२,१००) – गायत्री शुभम बर्वे (कोड क्र. १९५, नाशिकरोड)
🥉 तृतीय बक्षीस (₹१,२००) – रुपाली धीरज नेवे (कोड क्र. ३४०, गांधीनगर)
विजेत्यांना रोख बक्षिसांसह श्रीमद्भगवद्गीता कॅलेंडर, ईश्वरीय भेटवस्तू आणि सुविचार प्लेट देऊन गौरविण्यात आले.



प्रोत्साहन पुरस्कार विजेते (२१ स्पर्धक)
दिव्या विशाल राजपूत (विहितगाव), अनिता प्रकाश गोरे (जयभवानी रस्ता), ज्योती फ्रान्सिस नरोन्हा (जयभवानी रस्ता), राधाबाई संतोष परदेशी (उपनगर), कावेरी ईश्वर जगताप (दत्त मंदिर रोड), अनिता संजय उगडे (जयभवानी रस्ता), अश्विनी अमोल नेवे (रामदास स्वामी नगर), स्नेहल मुकेशकुमार शर्मा (जयभवानी रस्ता), तन्वी देवा वाघ (गंधर्व नगरी), गायत्री भाऊसाहेब चत्तर (जयभवानी रस्ता), सारिका योगेश दोंदे (आडके नगर), शैलजा संजय बोराडे (छाया कॉलनी), रुपाली उमेश चव्हाण, सुनंदा अशोक लोहार (जेलरोड), अंजली सूर्यकांत नेवे (गांधीनगर), भावना गजानन गोहिल (उपनगर), निलिमा जितेंद्र साळुंके (जयभवानी रस्ता), संगिता हेमंत राणे (नाशिकरोड), ताराबाई पडवळ (जयभवानी रस्ता), भावना नवनीत लोहार (जेलरोड) आणि तेजस्विनी स्वप्नील बोराडे (जयभवानी रस्ता) यांना ₹३०० चे गिफ्ट कूपन, श्रीमद्भगवद्गीता कॅलेंडर, ईश्वरीय भेटवस्तू व शुभेच्छा प्लेट देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे नियोजन ब्रह्माकुमारी संस्थेचे सदस्य, साप्ताहिक नाशिक परिसरचे प्रतिनिधीवृंद तसेच काबरा एम्पोरियमच्या कर्मचारीवर्गाने उत्कृष्टरीत्या पार पाडले. उपस्थित स्पर्धकांनी आयोजनाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक विचार, आध्यात्मिक मूल्ये आणि आनंदी जीवनशैलीचा प्रसार होत असल्याची भावना व्यक्त केली.

