नाशिक : (बीके महामीडिया वृत्तसेवा) ब्रह्माकुमारीजच्या मेडिकल विंग, नाशिक यांच्या वतीने ग्रेफाइट इंडिया लिमिटेड, अंबड येथे कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी विशेष आरोग्य जनजागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. “हार्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोक प्रतिबंध व लवकर निदान – वैद्यकीय व आध्यात्मिक पैलू” या महत्त्वपूर्ण विषयावर हे सत्र पार पडले.
कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बी.के. डॉ. राजेश यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत वाढणारे हृदयविकार, उच्च रक्तदाब, ताणतणाव, मधुमेह, चुकीच्या आहार पद्धती आणि व्यायामाच्या अभावामुळे हार्ट अटॅक व ब्रेन स्ट्रोकचा धोका कसा वाढतो, याबाबत सविस्तर माहिती दिली.
तसेच हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी दिसणारी लक्षणे, ब्रेन स्ट्रोकची प्रारंभिक चिन्हे, तात्काळ वैद्यकीय उपचाराचे महत्त्व, वेळेवर निदान आणि आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

बी.के. डॉ. राजेश यांनी आरोग्य टिकवण्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार, धूम्रपान व मद्यपानापासून दूर राहणे, नियमित तपासणी आणि मानसिक तणाव नियंत्रण आवश्यक असल्याचे सांगितले. यासोबतच ध्यान, राजयोग मेडिटेशन, सकारात्मक विचारसरणी आणि शांत मन यामुळे हृदय व मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या व्याख्यानाला ग्रेफाइट इंडिया लिमिटेडचे अधिकारी, कर्मचारी व स्टाफ यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपस्थितांनी कार्यक्रम उपयुक्त व मार्गदर्शक असल्याची भावना व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या शेवटी ब्रह्माकुमारीज मेडिकल विंग, नाशिक यांच्या सेवाकार्याचे कौतुक करण्यात आले व भविष्यातही अशा जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
✍️ ब्रह्माकुमारीज महामीडिया वृत्त सेवा
www.BkMahaMedia.com

