
नाशिकरोड परिसरातील श्रद्धास्थान असलेल्या श्री म्हसोबा महाराज मंदिरात वार्षिक यात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक व पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. १८ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या या त्रिवेणी यात्रोत्सवासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

श्री म्हसोबा महाराज देवस्थान हे नाशिक-पुणे रोड परिसरातील प्राचीन व जागृत देवस्थान मानले जाते. या देवस्थानाला हजारो भाविकांची श्रद्धा लाभली असून दरवर्षी यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनेक भक्तांनी नवस फेडण्यासाठी व दर्शनासाठी या मंदिरात गर्दी केली असून, या देवस्थानाची परंपरा संस्थापक कै. लक्ष्मणराव गोपाळ कदम यांच्या कृपाशीर्वादाने अखंड सुरू असल्याचे मानले जाते.

यात्रोत्सवानिमित्त शनिवार दि. १८ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता श्री म्हसोबा महाराज मूर्ती अभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ९ वाजता मंडप उद्घाटन कार्यक्रम होईल. रात्री ७ ते ९ वाजेपर्यंत तक्तराव मिरवणूक काढण्यात येणार आहे. याच दिवशी सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार दि. १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप करण्यात येणार असून, सकाळी ९ ते १० वाजता हजाऱ्यांचा कार्यक्रम श्री म्हसोबा महाराज मंदिरात होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता कदम मळा येथे पारंपरिक कुस्त्यांची विराट दंगल आयोजित करण्यात आली आहे. पंचांच्या निर्णयानुसार होणाऱ्या या स्पर्धेकडे कुस्तीप्रेमींचे लक्ष लागले आहे.

हा यात्रोत्सव प.पू. संस्थापक कै. लक्ष्मणराव गोपाळ कदम व प.पू. गंगाबाई पार्वतीबाई लक्ष्मणराव कदम यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष श्री. कसराय लक्ष्मणराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रोत्सव यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सूचना: यात्रेच्या दिवशी परिसरात मोठी गर्दी अपेक्षित असल्याने वाहनचालकांनी वाहने सावकाश चालवावीत, असे आयोजकांनी कळविले आहे.

