नाशिक : नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली असून महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग तसेच ऊर्जा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे भव्य मोफत महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात सुमारे ७००० युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
हा मेळावा गुरुवार, दिनांक ०९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला असून बालासाहेब ठाकरे स्मृती उद्यान, पंपिंग स्टेशन रोड, गंगापूर रोड, नाशिक येथे होणार आहे.
या रोजगार मेळाव्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे देशातील ६० पेक्षा अधिक मल्टीनॅशनल कंपन्यांचा सहभाग असणार आहे. नाशिकसह मुंबई, पुणे, संभाजीनगर, कांदिवली, गोवा आणि रायगड येथील नामांकित कंपन्या या ठिकाणी उपस्थित राहणार असून विविध क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत.
उमेदवारांसाठी थेट मुलाखतीची (Direct Interview) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच “On the Spot नोकरी” आणि काही ठिकाणी तत्काळ जॉइनिंग लेटर देण्याची सोयही करण्यात आली आहे.
या मेळाव्यात १०वी, १२वी पास किंवा नापास, आयटीआय, डिप्लोमा तसेच विविध पदवीधर युवकांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. फ्रेशर तसेच अनुभवी उमेदवार दोघांनाही या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे.
उमेदवारांनी उपस्थित राहताना शैक्षणिक कागदपत्रे, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि बँक पासबुक सोबत आणणे आवश्यक आहे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
या उपक्रमाचे आयोजन शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांच्या पुढाकारातून करण्यात आले असून त्यांनी युवकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींनाही याची माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.
नाशिकमधील बेरोजगार तरुणांसाठी हा मेळावा रोजगाराच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे चित्र आहे.

