नाशिक : निनाद कराओके क्लब अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि विद्योन्तमा फाउंडेशन, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने “डबल धमाका – शशी कपूर व नवीन निश्चल स्पेशल” या आगळ्या-वेगळ्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते शशी कपूर आणि नवीन निश्चल यांच्या गाजलेल्या गीतांना समर्पित हा विशेष कार्यक्रम रविवारी दि. १५ मार्च २०२५ रोजी सायं. ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम कुसुमाग्रज स्मारक, विशाल हॉल, विद्या विकास सर्कल, गंगापूर रोड, नाशिक येथे रंगणार असून संगीतप्रेमींसाठी ही एक खास पर्वणी ठरणार आहे. कार्यक्रमाचे संकल्पना व सूत्रसंचालन सुप्रसिद्ध गायक सुबोध कुमार मिश्रा करणार आहेत.
कार्यक्रमाचे संयोजन सविता सरडे आणि श्रद्धा शिंदे यांनी केले असून विविध गायक-गायिका आपल्या सुरेल आवाजात शशी कपूर आणि नवीन निश्चल यांच्या चित्रपटांतील गाजलेली गाणी सादर करणार आहेत. नाशिकमधील अनेक नामवंत गायक या कार्यक्रमात सहभागी होत असून प्रेक्षकांना जुन्या हिंदी चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळ अनुभवता येणार आहे.
या कार्यक्रमात ३ लकी ड्रॉ ठेवण्यात आले असून उपस्थित प्रेक्षकांना आकर्षक बक्षिसांची संधीही मिळणार आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम सर्वांसाठी प्रवेश निःशुल्क ठेवण्यात आला आहे.
संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुरेल मैफलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

