नाशिकरोड (प्रतिनिधी) :
अंकशास्त्र व रत्नशास्त्र क्षेत्रातील उल्लेखनीय संशोधन आणि कार्याबद्दल नाशिक येथील सौ. पद्मश्री ए. पेठकर यांना श्री महर्षी कॉलेज ऑफ वेदिक अॅस्ट्रोलॉजी, उदयपूर तर्फे “विद्या वाचस्पती”, अर्थात “डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी” ही पदवी प्रदान करण्यात आली.
त्यांच्या पीएच.डी. संशोधनाचा विषय “अंकशास्त्र आणि भाकित पद्धतींमध्ये त्याची भूमिका” असा असून भविष्यकथन पद्धतींमध्ये अंकशास्त्राची भूमिका आणि त्याचे व्यावहारिक महत्त्व या विषयावर त्यांनी सखोल संशोधन केले आहे. या संशोधन कार्यासाठी त्यांना डॉ. शेफाली बन्सल या मार्गदर्शक म्हणून लाभल्या. डॉ. अनिरुध्द पेठकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
पद्मश्री पेठकर या अंकशास्त्र, वैदिक ज्योतिष, टॅरो तसेच रत्नशास्त्र विषयात पारंगत असून त्यांना मौल्यवान रत्ने व उपरत्नांचे सखोल ज्ञान आहे. रत्नांची शास्त्रीय ओळख, गुणवत्ता परीक्षण आणि ज्योतिषानुसार योग्य रत्न निवड याबाबत त्यांचा विशेष अभ्यास आहे. त्या श्रीपद्मा कन्सल्टन्सीच्या संस्थापक असून वैयक्तिक सल्लामसलत तसेच रत्नशास्त्र मूल्यांकन अभ्यासक्रम मध्ये मार्गदर्शन व प्रशिक्षण वर्गही घेतात. डॉ. पद्मश्री पेठकर या अंकशास्त्र, रत्नशास्त्र, टॅरो व वैदिक ज्योतिष क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांनी “डिजिटल डेस्टिनी: मोबाईल कम्युनिकेशनमध्ये अंकशास्त्राची भूमिका अन्वेषण करणे”, “अंकशास्त्राद्वारे लग्नाचे योग्य वर्ष भाकित करणे” तसेच “कुआ संख्या आणि अंकशास्त्र” यांसारखे संशोधन लेख आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित केले आहेत.
या संशोधनामुळे नाशिकसह महाराष्ट्राच्या शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

