
नाशिक : इंदिरानगर परिसरातील रुंगठा शॉपिंग हब येथे स्थित राहुल साउंडट्रॅक रेकॉर्डिंग म्युझिक स्टुडिओ अँड कराओके सिंगिंग क्लब मध्ये रविवार दिनांक १ मार्च २०२६ रोजी गायन विषयक विशेष कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
या कार्यशाळेचे उद्घाटन नाशिक परिसर वृत्तपत्राचे संपादक मा. दिलीप बोरसे यांच्या हस्ते तसेच शास्त्रीय व सुगम संगीत तज्ञ श्री. नरेंद्र टोंगळे सर यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमास नाशिक शहर व परिसरातील अनेक हौशी व व्यावसायिक गायक-गायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यशाळेदरम्यान गायकांना गायन करताना येणाऱ्या विविध अडचणींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. परफॉर्मन्स करताना टायमिंग चुकणे, गाताना श्वासावर नियंत्रण न राहणे, वरच्या पट्टीतील स्वर गाठण्यात अडचणी येणे, आवाजातील स्थैर्य राखणे, स्वतःच्या हरकती आणि प्रेझेंटेशन प्रभावीपणे कसे सादर करावे, यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर तज्ञांकडून प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली.
याशिवाय माईक हाताळण्याची योग्य पद्धत, स्टेज प्रेझेन्स, आत्मविश्वास वाढविण्याचे तंत्र, रियाजाचे महत्त्व, आवाजाची काळजी कशी घ्यावी, डिजिटल रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये गाताना आवश्यक असलेली तांत्रिक माहिती अशा विविध अंगांनी मार्गदर्शन करण्यात आले. अत्याधुनिक व अद्ययावत सुविधांनी सुसज्ज स्टुडिओमध्ये प्रत्यक्ष सरावाची संधी उपलब्ध करून देण्यात आल्याने उपस्थित गायकांनी समाधान व्यक्त केले.
कार्यशाळेच्या शेवटी अनेक सहभागी गायकांनी आपली मते व्यक्त करत ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरल्याचे सांगितले. शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि परफेक्ट सादरीकरणासाठी अशा मार्गदर्शनाची मोठी गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

याच पार्श्वभूमीवर आता दर रविवारी दोन तासांची नियमित गायन विषयक कार्यशाळा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवोदित तसेच प्रगत गायकांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देऊन त्यांची कला अधिक परिपूर्ण करण्याचा या उपक्रमामागील हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी इच्छुकांनी ९४२३०७८३४२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

