नाशिक : दर्शनशास्त्राच्या क्लिष्ट विवेचनात सामान्य माणूस भांबावतो. त्यामुळे बुद्धाने दाखवलेला शांतीचा मार्ग स्वान्तसुखाय अंगीकारला पाहिजे. असे प्रतिपादन अयोध्या येथील श्री राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष संत गोविंददेव गिरी यांनी येथे केले.

नाशिक वसंत व्याख्यानमालेच्या ज्ञानयज्ञास शुक्रवारी (दि. 1) गोदाघाटावरील देवमामलेदार यशवंत महाराज पटांगणावर मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला. त्यावेळी ते ‘कथा तथागताची : संदेश… समतेचा, करूणेचा, प्रज्ञेचा ! अर्थात तथागत गौतम बुध्द’ या विषयावर ते बोलत होते. तत्पूर्वी सुरुवातीला मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘महाराष्ट्र गीत’ सादर केले. संगीत शिक्षक दिनकर दांडेकर यांनी संगीत संयोजन केले. किर्ती कलामंदिरच्या विद्यार्थिनींनी ‘वंदे मातरम’वर आधारित कलाविष्कार सादर केला. त्यांना अदिती पानसे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर बुध्द पौर्णिमेनिमित्त तथागत गौतम बुध्द यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अँड. वाल्मिकीराव निकाळजे यांनी बुध्द वंदना सादर केली. स्वागत समितीचे सचिव प्रा. जयंत साळवे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. तर व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते समता, करुणा व प्रज्ञेचा संदेश देणारे फुगे हवेत सोडुन व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. स्वागत समितीचे अध्यक्ष राजेंद्र गायकवाड व व्याख्यानमालेचे प्रायोजक सह्याद्री फार्मचे चेअरमन विलास शिंदे यांनी स्वामी गोविंददेव गिरी यांचा सत्कार केला. व्याख्यानमालेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वामीजींना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. प्रा. संगीता बफणा व अविनाश वाळुंजे यांनी सूत्रसंचालन केले. तर सचिव हेमंत देवरे यांनी आभार मानले.

संत गोविंददेव म्हणाले की, नाशिककरांची जडणघडण करण्यात वसंत व्याख्यानमालेचे मोठे योगदान आहे. त्यानंतर तथागत स्तवन सादर केले. ते म्हणाले की, आज संपूर्ण जगाला भगवान बुध्द यांनी दिलेल्या विचारांची गरज आहे. बुद्धीमुळे निर्माण होणारे सर्व संभ्रम प्रेमामुळे दुर होतात. अशा कथांमुळे अंतःकरण शुध्द होते. बौध्द भिक्षुक आश्वघोष यांनी भगवान बुद्धाचे हे चरित्र लिहिलेले आहे. भक्तीचा अर्थच प्रेम आहे. आपले पूर्वसुरी, संत विभूतीचे विचार आपल्याला प्रेरणा देत असतात. असे सांगत त्यांनी आपल्या मधुर वाणीद्वारे भगवान बुद्धांचे चरित्र कथन केले.
—-
उद्याचे (दि. 3) व्याख्यान (सायंकाळी 5.30 वाजता)
1. वक्ते : ब्रह्मकुमारी शिवानी दीदी
विषय : अनिश्चित समय में आंतरिक शक्ति
—
(सायंकाळी 8.00 वा.)
2. संत गोविंददेव गिरी
विषय : कथा तथागताची : संदेश समतेचा, करूणेचा, प्रज्ञेचा ! अर्थात तथागत गौतम बुध्द.

