*नाशिक:*
नाशिकरोड भागातील नवले चाळ येथे राहणाऱ्या एका नागरिकाचे घर बिल्डरने कोणतीही पूर्वसूचना किंवा परवानगी न घेता पाडल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मागील चार महिन्यांपासून न्याय मिळवण्यासाठी पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवूनही पोलिसांकडून केवळ ‘दिवाणी वाद’ असल्याचे सांगत टाळाटाळ केली जात आहे. पोलीस प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे व्यथित झालेल्या पीडित महेंद्र प्रकाश संसारे यांनी अखेर ३० जुलै २०२६ रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
*नेमके प्रकरण काय?*
मार्च २०२६ मध्ये नाशिकरोड येथील नवले चाळ परिसरात महेंद्र प्रकाश संसारे यांचे घर बिल्डर हरीश मथुरा प्रसाद गुप्ता, चेअरमन सायमन सॅमसन भंडारे आणि सेक्रेटरी प्रकाश आनंदा गांगुर्डे यांनी बळजबरीने तोडले. ही कारवाई करताना कोणतीही कायदेशीर नोटीस देण्यात आली नव्हती किंवा सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेण्यात आली नव्हती. घर पाडल्यानंतर संसारे यांच्या घरातील सोने-चांदी, टीव्ही, फर्निचर, वॉशिंग मशीन आणि इतर मौल्यवान वस्तू गहाळ झाल्या असून, त्यांचे अंदाजे ४२ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

**पोलिसांची अनास्था आणि ‘दिवाणी’ वादाचा शिक्का**
संसारे यांनी या घटनेची लेखी तक्रार नाशिकरोड पोलीस ठाण्यात केली, परंतु कोणतीही FIR नोंदवण्यात आली नाही. उलट, नाशिकरोड पोलिसांनी २३ जून २०२६ रोजी एक ‘समजपत्र’ देऊन हे प्रकरण ‘दिवाणी स्वरूपाचे’ असल्याचे सांगत अर्ज दप्तरी दाखल केला. पोलिसांच्या या भूमिकेवर संसारे यांनी तीव्र आक्षेप घेतला असून, घर पाडणे, मालमत्तेचे नुकसान आणि अनुसूचित जातीच्या व्यक्तीवर झालेला अन्याय या गंभीर फौजदारी बाबी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
**आयोगाकडून चौकशीचे आदेश, तरीही कारवाई शून्य**
या प्रकरणी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने (NCSC) दखल घेतली असून, त्यांनी ११ जून २०२६ रोजी नाशिकच्या पोलीस अधीक्षकांना नोटीस बजावून १५ दिवसांत कृती अहवाल (ATR) मागवला होता. इतकेच नव्हे, तर संसारे यांनी पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांकडे धाव घेऊनही त्यांना न्याय मिळालेला नाही. पीडित संसारे यांनी बिल्डर हरीश गुप्ता यांच्यावरील जुन्या अनेक न्यायालयीन प्रकरणांचा दाखला देत, त्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
*आत्मदहनाचा इशारा*
कुठल्याही स्तरावरून न्याय मिळत नसल्याने, पीडित महेंद्र प्रकाश संसारे यांनी ३० जुलै २०२६ रोजी, गुरुवारी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या तक्रारीची वरिष्ठ स्तरावर पुनर्पडताळणी व्हावी आणि दोषींवर फौजदारी कारवाई व्हावी, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
*पीडित महेंद्र प्रकाश संसारे यांचे आवाहन:*
“माझा उद्देश न्यायालयीन प्रक्रियेला विरोध करणे नसून, माझ्या तक्रारीतील फौजदारी स्वरूपाचे मुद्दे असल्याने त्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि दोषींवर योग्य कायदेशीर कार्यवाही व्हावी,” अशी विनंती त्यांनी केली आहे.

