*“शिवानी दीदी यांना ऐकणे परमभाग्य”
— ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांचे प्रतिपादन*
*मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित राहणार; ३ ठिकाणी एलईडी वॉलद्वारे नियोजन — श्रीकांत बेणी *

नाशिक- आजच्या वेगवान आणि धकाधकीच्या जीवनात कोणत्याही क्षणी काहीही अचानक घडू शकते. आरोग्य, नातेसंबंध, आर्थिक स्थिती किंवा वैयक्तिक जीवन — सर्व स्तरांवर परिस्थिती झपाट्याने बदलताना दिसते. अशा वेळी निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे नेहमी शक्य नसते; परंतु स्वतःची आंतरिक शक्ती मजबूत असेल, तर कोणतीही परिस्थिती शांतपणे आणि स्थिरतेने हाताळता येते.
मनाची ही स्थिरता, सकारात्मक विचारसरणी आणि आत्मिक शक्ती विकसित करण्याची गरज लक्षात घेऊन “अनिश्चित समय में आंतरिक शक्ती” या विषयावर ब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांचे व्याख्यान १०३ वर्षांची वैचारिक परंपरा असलेल्या वसंत व्याख्यानमालेत आयोजित करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम गोदाकाठ, पंचवटी परिसरातील देव मामलेदार श्री यशवंत महाराज पटांगण येथे दिनांक ३ मे २०२६ रोजी सायंकाळी ५.३० ते ८.०० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. जीवनातील ताण-तणाव, भीती आणि अस्थिरता यांवर मात करून आत्मिक शक्ती कशी वाढवावी याबाबत बीके शिवानी दीदी यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.

शिवानी दीदी यांच्या व्याख्यानाचा लाभ एका शहरात सहसा एकदाच मिळतो; मात्र नाशिककरांचे परम सौभाग्य असे की त्या तिसऱ्यांदा नाशिकमध्ये येत आहेत. त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे भविष्यात पुन्हा हा लाभ मिळेलच याची शाश्वती नसल्याने अधिकाधिक श्रोत्यांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपक्षेत्रीय मुख्य संचालिका ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांनी केले.
दिनांक २९ एप्रिल रोजी मुंबई नाका येथील शिवदर्शन भवन या सेवा केंद्रात वसंत व्याख्यानमाला आणि नाशिक येथील ब्रह्माकुमारी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार व वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेनी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी ब्रह्माकुमारी वीणा दीदी यांनी स्वागतपर भाषण केले. त्या म्हणाल्या की, “मीडिया हा समाजाला दिशा देणारा लोकशाहीतील महत्त्वाचा घटक आहे. प्रसारमाध्यम प्रतिनिधींचे स्वागत करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. हे स्वागत एकदाचे नसून, आपण वारंवार सेवा केंद्रात येऊन राजयोग मेडिटेशनद्वारे आपले तन-मन प्रफुल्लित करावे,” असे आवाहन त्यांनी केले.

वसंत व्याख्यानमालेतर्फे श्रीकांत बेनी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शिवानी दीदी यांचा नावलौकिक मोठा असून त्यांना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतात. यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे. गोदाकाठावरील पाडवा पटांगण, यशवंत महाराज समाधी मंदिर ते दत्त मंदिर दरम्यानचा परिसर, तसेच निळकंठेश्वर महादेव मंदिर ते रामसेतू पूल या दरम्यान श्रोत्यांसाठी बसण्याची आणि एलईडी वॉलद्वारे व्याख्यान पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
वाहन पार्किंगसाठी महापालिकेच्या सूचनेनुसार गाडगे महाराज पूललगत श्रद्धा लॉन्स, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे मैदान आणि गाडगे महाराज पूल ते तपोवन दरम्यानचा परिसर राखीव ठेवण्यात आला आहे.
सध्या शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे व्याख्यानासाठी येणाऱ्या श्रोत्यांनी नियोजित ठिकाणीच वाहन पार्क करावे आणि नियोजनाचे पालन करावे. आजारी, वयोवृद्ध आणि शारीरिकदृष्ट्या अक्षम व्यक्तींनी गर्दी लक्षात घेता दूरचित्रवाणी, यूट्यूब, केबल टीव्ही किंवा एलईडी स्क्रीनद्वारे कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. पोलीस व स्वयंसेवकांना सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन श्री बेनी यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. सूत्रसंचालन ब्रह्माकुमार दिलीप भाई यांनी केले, तर आभार प्रदर्शन ब्रह्माकुमार राजन भाई यांनी केले. पत्रकार परिषद यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब सोनवणे सर, ब्रह्माकुमार विकास भाई, ब्रह्माकुमार रजनीकांत भाई आदी सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.

