

*नाशिक रोड :* रक्षाबंधन हा सण बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचे आणि संरक्षणाच्या भावनेचे महत्त्व अधोरेखित करतो. मात्र, या पवित्र भावनेला आध्यात्मिक उंची देत ब्रह्माकुमारी सेवा केंद्रात भगवंताशी आध्यात्मिक संबंध जोडण्याचा संदेश देण्यात आला. भगवंताशी जोडलेला हा संबंध जीवनातील ताण-तणाव व समस्यांपासून दूर ठेवून सुख, शांती आणि समाधान प्रदान करतो, असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी शक्ती दीदीजी यांनी केले.
नाशिक रोड येथील ब्रह्माकुमारी राजयोग सेवा केंद्रात रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी यांच्या हस्ते उपस्थितांना रक्षासूत्र बांधण्यात आले. ब्रह्माकुमारी प्राजक्ता बहिण यांनी आत्मस्मृतीचा टिळा लावून रक्षाबंधनाचे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्माकुमार दिलीप भाई यांनी केले.


याप्रसंगी नगरसेविका पूजा नवले, नगरसेविका आशा तळवी व नगरसेविका ज्योती जोंधळे यांनी परिवारासहित उपस्थित राहून रक्षाबंधन कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ब्रह्माकुमारी प्राजक्ता बहिण यांनी रक्षाबंधनाचे आध्यात्मिक रहस्य स्पष्ट केले. महाभारतातील प्रसंगाचा संदर्भ देताना त्यांनी सांगितले की, संकटाच्या वेळी द्रौपदीने सभेतील सर्वांकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली; मात्र शेवटी भगवंताचा धावा केल्यानंतर भगवंत तिच्या मदतीसाठी धावून आले. त्याचप्रमाणे आपणही जीवनातील विविध नातेसंबंधांच्या पलीकडे जाऊन बुद्धीने एकमेव भगवंताचे स्मरण केले, तर जीवनातील संकटांवर मात करण्याची शक्ती प्राप्त होते. भगवंताच्या स्मरणाने विकारांपासून मुक्त होऊन सुख-शांतीमय जीवन जगता येते, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास काबरा एम्पोरियम, बालाजी मंदिर संस्थान, साप्ताहिक नाशिक परिसर यांसह विविध संस्थांचे कार्यकर्ते, प्रतिनिधी व कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ब्रह्माकुमारी शक्ती दीदीजी व ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी यांच्या हस्ते उपस्थितांना रक्षासूत्र बांधण्यात आले. त्यानंतर आध्यात्मिक टिळा लावून प्रसादाचे वाटप करण्यात आले. मेडिटेशनच्या माध्यमातून उपस्थितांनी आत्मिक सुख, शांती व सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घेतला.

