

नाशिक रोड-(दि. 14 फेब्रुवारी)- येथील ब्रह्माकुमारी सेवा केंद्रात महाशिवरात्री निमित्त शिव ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी संस्थेच्या उपस्थित संचालिका ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या प्रमुख पाहुणे म्हणून बालाजी सोशल फाउंडेशन चे संस्थापक व विजन अकॅडमी चे संचालक नवनिर्वाचित नगरसेवक कैलास अण्णा मुदलियार, नगरसेविका डॉ. सीमाताई ताजने, नगर सेविका सौ. प्रमिला मैंद, बी के शक्ती दीदी, बी के पुष्पा दीदी, बी के कावेरी दीदी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते शिवध्वजारोहण करण्यात आले. समाजात मूल्य प्रस्थापित होण्यासाठी तसेच आपल्या हातून सर्वांचे भले होण्यासाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा याप्रसंगी शिव ध्वजाच्या खाली करण्यात आली. कलियुग जा रहा है सतयुग आ रहा है…. सब सत्य में सत्य महान शिव है गीता का भगवान…अशा घोषणा देऊन सर्वांमध्ये नवा चैतन्य निर्माण झाले.


प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित नगरसेवक कैलास अण्णा मुदलियार यांनी संस्था करीत असलेल्या कार्याचा गौरव केला. धर्म जागृतीच्या कार्यात ब्रह्माकुमारी संस्थेचा खूप मोठा सहभाग असतो. संस्थेचे हे लोक उपयोगी कार्य अधिकाधिक वृद्धी पावत जावे अशा शब्दात मुदलियार यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
आजची युवा पिढी मोबाईलच्या विळख्यात अडकून पडली आहे. अनेक व्याधी व्यसने यामुळे वाढली आहेत या सर्वांवर ब्रह्माकुमारी संस्थेचा ध्यान धारणा हे खूप उपयोगी सिद्ध होऊ शकते यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनात राजयोग ध्यान साधनेचा अंगीकार करावा. या ध्यान धारणेतून आपले जीवन उन्नत बनते. मेडिसिन जरी चालू असले तरी मेडिटेशन मुळे मेडिसिन कमी करण्यात उपयोग होतो हे मी डॉक्टर या नात्याने अनुभवाने सांगू शकते. असे प्रतिपादन डॉक्टर सीमा ताजणे यांनी याप्रसंगी केले.

सौ. मैंद यांनी ब्रह्माकुमारी संस्थेच्या लोक उपयोगी कार्याची समाजाला खूप गरज असून अशा कार्यासाठी आम्ही नेहमीच उपस्थित राहू अशा शब्दात शुभेच्या व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी यांनी तर सूत्र संचालन ब्रह्माकुमार दिलीप भाई यांनी केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने नाशिक रोड केंद्राचे सदस्य उपस्थित होते.

