
हिंदू धर्म म्हटला की अनेक सण उत्सव येतात ते साजरे करण्याचा आनंदही वेगळा असतो. नोव्हेंबर महिना आला की ओढ लागते नवीन येणाऱ्या दिग्नदर्शिकेची. त्यावर दिसणारे सण तारखा वगैरे बघण्याची पण या उत्सवाची तारीख मात्र कधीच बदलत नाही आणि तो उत्सव आहे आमच्या महाराष्ट्राच्या राजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा. आलेच असेल लक्षात? हो मी 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात अगदी जल्लोषात साजरा होणारा उत्सव म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीबद्दल थोडक्यात लेखन करत आहे.

मराठ्यांचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर करणाऱ्या या महा प्रतापशाली वीराचे पराक्रम विस्तृतपणे लिहू तितके कमीच. लिहिणाऱ्याचे हात थकतील. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहायचे म्हणजे कुठल्यातरी महान ग्रंथाचा किंवा पुस्तकाचा आधार तर नक्कीच घ्यावा लागणार. आणि हो मीही घेतलाय कारण या महान व्यक्तिबद्दल लिहायला हात खरोखरच थरथरत आहेत. पण अगदी उद्याच शिवजयंती उत्सव येणार आहे आणि माझे हात गप्प राहतील का शक्य नाही. मनात एवढीच भीती होती लिहिताना, माहितीतील प्रत्येक गोष्ट प्रसंग किंवा त्यातील इ.स. वगैरे चुकता कामा नये.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये कुसुर येथील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई शहाजी भोसले असे होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज मालोजी भोसले, लखुजी जाधव, बाबाजी भोसले इत्यादी होते. तर त्यांची वंशज पहिले शाहू, अंबिकाबाई महाडिक, राणूबाई जाधव, राजाराम भोसले इत्यादींचा उल्लेख इतिहासामध्ये प्रामुख्याने आढळतो. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील भोसले घराण्यातील एक थोर भारतीय शासक होते. त्यांनी विजापूरच्या आदिलशाही आणि मुघल साम्राज्याशी लढा देऊन स्वतंत्र मराठा साम्राज्याची स्थापना केली.
लहानपणापासूनच स्वराज्याची स्थापना हा बीजमंत्र राजमाता जिजाऊ भोसले यांनी त्यांच्या मनात पेरला होता. लहानपणापासूनच स्वराज्य, स्वाभिमान आणि धर्माचे संस्कार यांची शिकवण त्यांनी शिवबाला दिली होती. यामुळे छत्रपती शिवरायांना अगदी लहानपणापासूनच स्वराज्याची प्रेरणा त्यांच्या मातेकडूनच मिळालेली होती. लहानपणापासूनच स्वतःसाठी नाही पण ते इतरांसाठी तसेच धर्मासाठी लढले होते.जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेल्या शिवाजी महाराजांनी गनिमी कावा या तंत्राचा वापर करून अनेक किल्ले जिंकले. आरमार व समुद्रातील किल्ले त्यांनी जिंकले होते. मोघलांच्या राज्यात न घाबरता स्वा-या केल्या होत्या,सुरतेची व बांसिलोर शहरात लूट केली होती, अफजलखानाचा वध हा देखील इतिहासात गाजलेला प्रसंग, सोबतच शाहिस्तेखान यांची बोटे कापणे, आग्र्याहून करून घेतलेली सुटका अशी अनेक प्रसंग आपल्याला त्यांच्या शौर्याची आणि परक्रमाची ओळख करून देतात. कितीतरी गेलेले किल्ले प्रांत त्यांनी परत मिळविले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांकडे प्रशासकीय कौशल्य होते 1674 मध्ये रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला त्यानंतर त्यांनी एक प्रजाहितदक्ष राज्यकारभार निर्माण केला. ज्यामध्ये कृषी, जलसिंचन आणि प्रशासकीय सुधारणांवर भर देण्यात आला होता. महाराजांनी गनिमी कावा युद्धनीती विकसित करून भारताचे पहिले मोठे नौदल स्थापन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज स्वधर्म सोबतच इतर सर्व धर्माचा आदर करत असत. त्यांच्या गुणांचे विवेचन करावे तेवढे कमीच आहे. त्यांच्याकडे होता तो स्वधर्माभिमान, लोकसंग्रह व औदार्य, निपक्षपात बुद्धी, निष्कपटीपणा व मित्रभाव, जरब, उद्यमशीलता, कल्पकता, तेजस्विता, स्वप्रजावात्सल्य, व्यवहारिकता, कौटुंबिक वर्तन, धर्मनिष्ठा असे अनेक गुणधर्म शिवाजी महाराजां मध्ये होते म्हणूनच तर त्यांना छत्रपती ही उपाधी देण्यात आली होती. दिनांक 3 एप्रिल 1680 रोजी रायगड किल्ल्यावर त्यांचा मृत्यू झाला.

छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी महाराष्ट्रात स्वराज्याची ठिणगी टाकून एक महान इतिहास रचला आणि आजही त्यांचे स्थान हे प्रेरणादायी आहे. राजमाता जिजाऊ यांनी दिलेल्या संस्कारांमुळे तसेच मार्गदर्शनामुळे शिवाजी महाराजांचे छत्रपती शिवाजी राजे झाले. माझ्या या लेखातून मी एवढेच सांगू इच्छिते की आज जिजाऊंनी जसे संस्कार शिवबांना दिले तसेच आजच्या पिढीला त्यांच्या आई कडून मिळाले तर कितीतरी शिवाजी राजे आपल्याला बघायला मिळतील. नुसती दाढी वाढवून शिवबा सारखी तयारी करून कुणी राजे होत नसतात तर त्यांच्यासारखे गुण अंगी बाळगावे लागतात. जेव्हा त्यांच्यासारखे गुण अंगी बाळगले जातील तेव्हाच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी होईल असे मला तरी वाटते. तुम्हाला काय वाटते?
धन्यवाद 🙏
*सौ. वैभवी नंदकुमार मराठे*
*नाशिक.*


