*डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात ‘म्युझिकल योगा’ उपक्रम*

नाशिक – (दिनांक २२) अभ्यासाचा वाढता व्याप आणि ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी मराठा विद्या प्रसारक समाज संचलित डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व ब्रह्मकुमारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘म्युझिकल योगा व मेडिटेशन’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ. उज्ज्वल कापडणीस यांनी डिझाइन केलेल्या या विशेष उपक्रमाचा शुभारंभ २२ डिसेंबर रोजी महाविद्यालय प्रांगणात उत्साहात झाला.
मविप्रचे सरचिटणीस Adv. नितीन ठाकरे, शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे व अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शिरीष राजे व त्यांच्या सहकाऱ्यांनी म्युझिकल योगाची प्रात्यक्षिके सादर केली. ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “शारीरिक आणि मानसिक योग एकत्र केल्यानेच खऱ्या अर्थाने ताणतणावापासून मुक्ती मिळते. अभ्यासाच्या धावपळीत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढणे ही काळाची गरज आहे.” यावेळी डॉ. उज्ज्वल कापडणीस यांनी सांगितले की, “हा एक हाय इंटेन्सिव्ह इंटरव्हल ट्रेनिंग’ प्रोग्राम आहे. यामध्ये संगीताच्या तालावर हृदयाची गती वाढवून ती पुन्हा पूर्ववत केली जाते. मेडिकलच्या विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी आणि शारीरिक क्षमतेसाठी हा प्रकार अत्यंत प्रभावी ठरेल.” असे सांगितले. या उपक्रमासाठी डॉ. मनीषा कापडणीस, डॉ. प्रेमा जोशी प्राध्यापक व विभाग प्रमुख,डॉ. सतीश वाघमारे, प्राध्यापक शारीरक्रियाशास्त्र विभाग, यांनी कार्यक्रमाचे उत्तम संयोजन करून मोलाचे सहकार्य केले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग व फिजिओथेरपी महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

