- जीएसटीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ, सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा – भाजपा प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये
नाशिक : वस्तू व सेवा कर (जीएसटी) हा देशातील सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सुख-समृद्धी आणणारा आणि अर्थव्यवस्थेला गती देणारा क्रांतिकारक निर्णय असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले. ते नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
उपाध्ये म्हणाले की, जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर करप्रणालीतील गुंतागुंत कमी झाली असून व्यापार व्यवहार सुलभ झाले आहेत. उत्पादनवाढीस चालना मिळाल्यामुळे बेरोजगारी कमी होण्यास मदत झाली आहे. शेतकरी, कामगार, महिला, युवक, मध्यमवर्गीय तसेच लघु व मध्यम उद्योगांना या सुधारणेचा थेट लाभ होणार आहे.
देशाला २०१४ पूर्वी आर्थिक अस्थिरता, महागाई व भ्रष्टाचाराचा सामना करावा लागत होता. त्या काळात विकासाचा वेग मंदावला होता. परंतु मोदी सरकारने विविध आर्थिक सुधारणांची अंमलबजावणी करून देशाच्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी दिली आहे. त्यामुळे आज भारत जागतिक स्तरावर २५ प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“मोदी सरकार हे सत्तेसाठी नव्हे, तर सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. गरीब, शेतकरी, मध्यमवर्गीय, लघु व मध्यम उद्योग, प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठीच सरकार प्रयत्नशील आहे,” असे उपाध्ये यांनी नमूद केले.
पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना उपाध्ये यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिले. या प्रसंगी भाजपा नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांच्यासह सहप्रवक्ता अजित चव्हाण उपाध्यक्ष चित्रेश वास्पते, महिला मोर्चाच्या स्वाती भामरे, एडवोकेट श्याम बडोदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



