इंदिरानगर येथे ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे भव्य रक्तदान शिबिर यशस्वीरित्या संपन्न
नाशिक (प्रतिनिधी) – ब्रह्माकुमारी संस्थेच्या मुंबई नाका सेवा केंद्रातर्फे इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथे दिनांक 23 ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ब्रह्माकुमारी वीणा दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भारतातील व नेपाळ येथील 6000 पेक्षा अधिक सेवा केंद्र मध्ये हे रक्तदान शिबिर दिनांक 23, 24, 25 ऑगस्ट या दरम्यान संपन्न होणार आहे यामध्ये एक लाख युनिट रक्त संकलनाचा निर्धार ब्रह्माकुमारी संस्थेने केलेला आहे.
आज दिनांक 23 रोजी संपन्न झालेल्या शिबिराचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक श्याम बडोदे, नगरसेवक चंद्रकांत खोडे, नगरसेवक यशवंत निकुळे, सामाजिक कार्यकर्ते अवधूत कुलकर्णी व सचिन कुलकर्णी, अशोका हॉस्पिटलचे रेडिओलॉजिस्ट डॉ. राजेश जावळे, तसेच नवजीवन ब्लड बँकेचे डॉ. गुजराती आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरात 101 वे रक्तदान करणारे अवधूत कुलकर्णी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच ब्रह्माकुमारी संस्थेचे राजयोगी महेश खेडकर, स्वप्नील सोनवणे व इतर रक्तदात्यांचा प्रतिनिधी स्वरूपात सन्मान करण्यात आला.
या शिबिराच्या निमित्ताने ब्रह्माकुमारी वीणा दीदी म्हणाल्या – “ब्रह्माकुमारी संस्थेच्या पूर्व प्रशासिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी प्रकाशमणी दादीजी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. दादी जी यांचा स्मृतिदिन ‘विश्वबंधुत्व’ दिवस म्हणून मानण्यात येतो याचेच औचित्य साधून ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे देशभरात एक लाख युनिट रक्तदान करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. आदरणीय दाजी यांनी विश्वाला एकतेचा व वसुधैव कुटुंबकम चा संदेश दिला होता दादीजींच्या या शिकवणीला स्मरणात ठेवूनच आम्ही ब्रह्माकुमारी सदस्य विश्व सेवेचे कार्य करीत असून दादीजींचा हा स्मृतिदिन संस्मरणीय करण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
डॉ. राजेश जावळे म्हणाले – “रक्तदान हे खरेच महापुण्य असून, समाजासाठी हे कार्य प्रत्येकाने केले पाहिजे.”
रक्तदानातून असंख्य रुग्णांचे प्राण वाचवता येतात. डॉक्टर हे मोठे शिक्षण घेऊन रुग्णांचे प्राण वाचवतात मात्र रक्तदाता हा आपले ४६० एम एल रक्त देऊन सुद्धा अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतो. रक्तदानाद्वारे जीवदान देतो. त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान हे आपले कर्तव्य समजले पाहिजे.”
नवजीवन ब्लड बँकेचे टेक्निकल सुपरवायझर हजर खान यांनी सांगितले की मी अनेक ठिकाणी रक्त संकलन करण्यासाठी जातो मात्र या ठिकाणी ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे लावण्यात आलेल्या या शिबिरात महिलांचा उल्लेखनीय सहभाग आढळला महिलांमध्ये रक्तदान न करू शकणाऱ्या अनेक महिला असतात मात्र या ठिकाणी महिलांचा सकारात्मक प्रतिसाद असून अनेक महिला ह्या उत्साहाने रक्तदान करण्यासाठी पुढे येत आहेत.
या रक्तदान शिबिरात एकूण 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले. काहींना शारीरिक कारणांमुळे रक्तदान करता आले नाही, तरी त्यांचा उत्साह कौतुकास्पद होता.
सर्व रक्तदात्यांना ब्रह्मकुमारी विना दीदी यांच्या हस्ते ईश्वरीय प्रसाद, ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे प्रमाणपत्र तसेच नवजीवन ब्लड बँकेतर्फे प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रमाणपत्राच्या आधारे रक्तदात्यास कधीही गरज पडल्यास निशुल्क रक्त उपलब्ध करून देण्यात येईल, असे नवजीवन ब्लड बँकेतर्फे सांगण्यात आले.
मुंबई नाका सेवा केंद्राच्या सदस्यांनी मोठ्या उत्साहाने व समर्पणभावनेने कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले.
पुढील रक्तदान शिबिरे
| या मालिकेतील रक्तदान शिबिराचे आयोजन तीन ठिकाणी करण्यात आले असून, त्यापैकी पहिले शिबिर इंदिरानगर येथे यशस्वीरित्या संपन्न झाले.
दुसरे शिबिर 24 ऑगस्ट रोजी मेरी सेवा केंद्रातर्फे ब्रह्माकुमारी वासंती दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणार आहे. तर तिसरे शिबिर 25 ऑगस्ट रोजी नाशिक रोड सेवा केंद्रातर्फे ब्रह्माकुमारी शक्ती दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. |


