
देशातील आठ राज्य व चंदीगड या केंद्रशासित राज्यात दिव्यांगांसाठी दिव्यांग अभियानाचे आयोजन
नाशिक (दि.३०जून) – माउंट आबू मुख्यालयातून आलेल्या दिव्यांग सेवा अभियानामुळे नक्कीच दिव्यांग व्यक्तींना याचा लाभ होणार आहे. आपण सर्वसामान्य जणांना सुद्धा दिव्यांग व्यक्तींविषयी खूप प्रेम व सहानुभूती जागृत करण्याचे कार्य या अभियानाद्वारे होत आहे. अभियानाचे मुख्य प्रवर्तक सूर्यप्रकाश राव भाई यांच्यामार्फत सुद्धा अतिशय खोलवर या विषयाला समजून सांगण्यात येत आहे. यातून आम्हाला नक्कीच प्रेरणा मिळाली आहे की अशा प्रकारचे अधिकाधिक कार्यक्रम दिव्यांगांसाठी व्हावेत, समाजातील इतरही लोकांना या कार्यक्रमांपासून नक्कीच प्रेरणा मिळेल. असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांनी केले.
ब्रह्माकुमारी संस्थेच्या मुख्यालय माउंट आबू येथील दिव्यांग सेवा प्रभाग तर्फे संपूर्ण भारतात दिव्यांगांच्या सेवेसाठी तसेच दृष्टी बाधित कर्ण बाधित व बुद्धिबद्धीत तसेच मल्टिपल डिसॅबिलिटी असलेल्या व्यक्तींच्या उत्थानासाठी अभियान राबविण्यात येत आहे. देशातील आठ राज्य व एक चंदीगड या केंद्रशासित राज्यात दिव्यांगांसाठी सेवा देण्याचे कार्य या ब्रह्माकुमारी संस्थेच्या प्रभागातर्फे करण्यात आले आहे. महाराष्ट्रात विविध जिल्ह्यातून हे अभियान कार्यरत आहे. नाशिक जिल्ह्यात दिनांक 30 जून रोजी ब्रह्माकुमारी संस्थेच्या जिल्हा मुख्यालय प्रभू प्रासाद येथे या अभियानाची सुरुवात करण्यात आली. या अभियानादरम्यान नाशिक जिल्ह्यातील व शहरातील विविध दिव्यांग शाळा, अशासकीय संस्था व दिव्यांग हॉस्पिटल मध्ये जाऊन दिव्यांगांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी जी या बोलत होत्या.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदच्या समाज कल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर, आदिवासी विकास भवनचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा, सहाय्यक सचिव सचिन दळवी, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त तथा आशीर्वाद योगा व नॅचरोपॅथी कॉलेजचे संस्थापक प्राचार्य नितीन शिंपी सर, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व आश्रम शाळा संघटना कार्यवाहक विनोद हिरे सर, निरंजन मल्टिपल डिसेबिलिटी स्कूलच्या संस्थापिका श्रीमती ज्योती आव्हाड, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी अधिकारी संघटना चे अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी विविध ठिकाणाहून उपस्थित दिव्यांग व्यक्तींना सुद्धा दीप प्रज्वलनासाठी आमंत्रित करण्यात आले.
पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक करतांना ब्रह्माकुमार दिलीप भाई यांनी सांगितले की, ब्रह्माकुमारी संस्था समाजाच्या विविध घटकांपर्यंत ईश्वरीय ज्ञान व राजयोग पोहोचण्यासाठी कटिबद्ध असून या कार्यात संस्थेच्या विविध २१ विंग्सचा उल्लेखनीय सहभाग आहे. यातच समाजापासून अलिप्त राहिलेला दिव्यांग वर्ग सुद्धा मुख्य प्रवाहात यावा, मूल्य शिक्षणाची द्वारे यांच्यासाठी सुद्धा खुली व्हावी, अध्यात्मिक ज्ञान या वर्गाला सुद्धा मिळावे यासाठीच ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे दिव्यांग सेवा प्रभाग स्थापन करण्यात आलेला आहे. या प्रभागाचे राष्ट्रीय समन्वयक संस्थेचे वरिष्ठ राजयोगी ब्रह्माकुमार सूर्यमणिदास भाई असून त्यांच्या प्रेरणेनेच आजचे हे अभियान साकारले जात आहे असे प्रतिपादन ब्रह्माकुमार दिलीप भाई यांनी याप्रसंगी केले.
अभियानाचे मुख्य प्रवर्तक व दिव्यांग सेवा प्रभागाचे मुख्यालय समन्वयक ब्रह्माकुमार सूर्यप्रकाशराव भाई यांनी दिव्यांग व्यक्तींच्या सेवेसाठी ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे चालवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. दिव्यांग व्यक्तींना सक्षम बनवणे, सर्व समावेशकता आणि समानता सुनिश्चित करणे हे या दिव्यांग सेवा प्रभागाचे ब्रीद वाक्य आहे. ब्रह्माकुमारी संस्थेत द्वारे स्वनिर्मित सृजनशील उपकरणांच्या सहाय्याने दिव्यांग व्यक्तींना शिक्षित करून मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य या अभियानाद्वारे होत आहे. या कार्यात स्थानीय सेवा केंद्रातील ब्रह्माकुमारी साधकांना सुद्धा प्रशिक्षण देऊन सम्मिलित करून घेण्यात येते. येत्या हप्त्याभरात नाशिक मधील विविध दिव्यांग शाळा, अशासकीय संस्था व दिव्यांग हॉस्पिटल्स मध्ये जाऊन जनजागृती करण्याचा मानस असल्याचे ब्रह्माकुमार सूर्यप्रकाशराव भाई यांनी याप्रसंगी नमूद केले. दृष्टीबादीत, श्रवण बाधित, बुद्धिबाधित व शारीरिक दृष्ट्या विकलांग असे दिव्यंगांचे विविध प्रकार असतात मात्र अशा व्यक्तींना कुठल्याही प्रकारे त्यांच्या व्यंगाने न संबोधता यांना दिव्यांग म्हणावे अशी कळकळीची विनंती सूर्यप्रकाश राव भाई यांनी याप्रसंगी केली.
पाहुणे म्हणून उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले
जिल्हा समाज कल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, दिव्यांगांविषयी ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे उच्च कोटीची सेवा घडत आहे, या दिव्यांग सेवा कार्यासाठी प्रशासनातर्फे काही एक मदत लागल्यास आमची साथ सदैव असेलच अशी ग्वाही बडगुजर मॅडम यांनी याप्रसंगी दिली.
आदिवासी विकास भवनचे अप्पर उपायुक्त दिनकर पावरा यांनी सांगितले की आपण जे विचार करतो त्यांचे रूपांतर कृतीत होते त्यामुळे आपण नेहमी सकारात्मक विचार केले पाहिजे. दिव्यांग बंधूंसाठी ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे हा खूप छान उपक्रम राबविला जात असून यातून दिव्यांगांना नक्कीच दिव्य अनुभव येतील. या अभियानात आम्ही संपूर्णपणे सहभागी आहोत. पावरा यांनी मत व्यक्त केले.
आशीर्वाद योगा व नॅचरोपॅथी कॉलेजचे संस्थापक प्राचार्य नितीन शिंपी सर यांनी सांगितले की ब्रह्मकुमारी संस्था समाजाच्या विविध घटकांपर्यंत ध्यान धारणा पोहोचत आहे परंतु आज विशेष आनंदाची बाब ही आहे की दिव्यांगांना सुद्धा मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य या संस्थेमार्फत या अभियानाद्वारे होत आहे. या विश्वव्यापी संस्थेचे याबद्दल मी अभिनंदन करतो असे श्री नितीन शिपी यांनी नमूद केले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व आश्रम शाळा संघटना कार्यवाहक विनोद हिरे सर यांनी सांगितले की, ब्रह्माकुमारी संस्थेचे दिव्यांग सेवा प्रभाग दिव्यांगांसाठी इतक्या प्रभावशाली पद्धतीने कार्य करीत आहे, शासनाने दिव्यांगांसाठी ज्या काही सुविधा असतील त्या या अभियानासाठी उपलब्ध करून द्याव्यात.
निरंजन मल्टिपल डिसेबिलिटी स्कूलच्या संस्थापिका श्रीमती ज्योती आव्हाड यांनी सांगितले की त्या गेल्या आठ वर्षांपासून ब्रह्माकुमारी संस्थेच्या सदस्या आहेत. ब्रह्मकुमारी संस्थेत येण्यापूर्वी त्यांचा एकुलता एक मुलगा ब्लड कॅन्सरने वारल्यानंतर त्या अतिशय दुःखी होत्या, मात्र ब्रह्माकुमारी संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर त्यांचे दुःख डिप्रेशन हे दूर झाले व त्या आता राजयोगाचा अभ्यास करून आनंदी जीवन जगत आहेत व निरंजन मल्टी डिसेबिलिटी स्कूलच्या माध्यमातून अनेक दिव्यांगांना सुद्धा आनंदी जीवन देत आहेत
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांनी तर आभार प्रदर्शन ब्रह्माकुमार बाळासाहेब सोनवणे यांनी व्यक्त केले ब्रह्माकुमारी गोदावरी दीदीनी आलेल्या पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व ईश्वरीय भेटवस्तू देऊन स्वागत केले.
कार्यक्रमात परिसरातील नागरिक व ब्रह्माकुमारी संस्थेचे सदस्य सोबत दिव्यांग बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सभागृहात प्रदर्शित विविध सृजनशील चित्र प्रदर्शनी दिव्यांगांचे गुणवर्धक खेळ, ब्लॉक पझल गेम, जीवनात गुणांचे महत्त्व सांगणारे खेळ व प्रदर्शित सृजनशील उपकरणांची माहिती सूर्यप्रकाश राव भाई यांनी उपस्थितांना करून दिली.


