हळदीकुंकू का करतात?

हळदीकुंकू का करतात?
हळदीकुंकू का करतात?

हळदीकुंकू का करतात?

       हळदी कुंकू का करतात? हा सर्वसामान्य व्यक्तीला तसेच सर्वच महिलांना पडलेला प्रश्न आहे.त्यामागील परंपरा, कथा काहींना माहित आहे तर काहींना माहित नाही त्यासाठी मी सौ. वैभवी नंदकुमार मराठे आज माझ्या या लेखातून हळदीकुंकूचे महत्व काय आहे. यावर माझे विचार व्यक्त करत आहे.

       हळदी कुंकू हे मकर संक्रांती पासून ते रथसप्तमी पर्यंत साजरे केले जाते. मकर संक्रांत हा सण सूर्याच्या दक्षिणेकडून उत्तर गोलार्धात अर्थातच उत्तरायण प्रारंभ करतो. सूर्य धनु राशीतून मकर राशी मध्ये प्रवेश करतो, जो भरपूर आनंद आणि समृद्धी आणणारा मानला जातो. या दिवसापासून थंडी कमी आणि तीळ तीळ उन्हाळा वाढायला.सुरुवात व्हायला लागते. सूर्याचा मकर राशी मधे प्रवेश म्हणून या दिवसाला मकर संक्रांती असे म्हणतात. मकर संक्रांतीला तिळगुळाचे दान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तिळातील स्निग्धता आणि गुळातील गोडवा असे दोघांमधील गुणधर्म मानव जातीमध्ये उतरून एकमेकातील प्रेम आणि आपलेपणा वाढावा या दृष्टिकोनातून तिळगुळाचे लाडू, तिळगुळाची वडी किंवा अगदी तीळ आणि गूळ कुटून पदार्थ तयार करून एकमेकांच्या हातावर ठेवून तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हटले जाते. ज्येष्ठ व्यक्तींकडून आशीर्वाद घेतला जातो तर लहानास आशीर्वाद दिला जातो. या दिवसांपासून ऊस, भात, तीळ यासारख्या पिकांसाठी हंगामाची सुरुवात होते मकर संक्रांतीला गंगा, गोदावरी, प्रयाग आदी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला देखील विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. म्हणूनच यंदा २०२५ मध्ये प्रयाग येथे १४४ वर्षांनी महाकुंभाचे आयोजन मोठ्या थाटामाटात करण्यात आलेले आहे. हजारो साधू आणि लाखो भाविक, श्रद्धाळू या शाही कुंभस्नानाचे भव्य दर्शन मिळावे याची आतुरतेने वाट बघत आहेत. 

हिंदू धर्म ग्रंथानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूने दानवांनी पसरवलेल्या दहशतीचा पराभव करून त्यांचे डोके तोडून त्यांना एका पर्वताखाली दफन केले. जे नकारात्मकतेच्या समाप्तीचे प्रतीक आहे. चांगले समृद्ध जीवन जगण्याचा हेतू देखील आहे. मकर संक्रांत ही ग्रेगोरियन कॅलेंडरच्या १४ जानेवारी रोजी येते,पण लीप वर्षांमध्ये १५ जानेवारी रोजी साजरी केली जाते मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीला भोगी असे म्हणतात. हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. नवीन वर्षातील पहिलाच सण म्हणून हळदी कुंकाला जास्त महत्त्व दिले गेले आहे. हळदीकुंकूचा उद्देश म्हणजे ब्रह्मांडातील सूक्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत करणे असतो, सुहासिनींमधील आदिशक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक समारंभ असतो, पतीच्या दीर्घायुष्यासाठी मागणे मागितले जाते, दृष्ट न लागता सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडावे हे मागणे देवाकडे असते आपली शरीर कांती उजळ करून घेणे हा देखील उद्देश असतो.

       हळदी कुंकू समारंभ हा भारतातील सामाजिक मेळावा आहे. ज्यामध्ये विवाहित स्त्रिया त्यांच्या विवाहित स्थितीचे प्रतीक म्हणून त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असते. स्त्रिया हळद आणि कुंकू याची देवाण-घेवाण करतात. या दिवशी स्त्रिया आपल्या घरी सुवासिनींना आमंत्रित करतात, हळद कुंकू लावतात, हाताला अत्तर लावतात, तिळगुळ देतात, गुलाब जल शिंपडतात हळदी कुंकवाचे वाण देतात आणि यथाशक्ती अल्पोपहार देखील देतात. आता आधुनिक काळात स्त्रियांना वेळ नसल्याकारणाने अनेक मोठ्या सोसायटीमध्ये देखील हा कार्यक्रम एकत्रितरित्या करतात. हळदी कुंकू करणे म्हणजे एक प्रकारे ब्रम्हांडातील सूक्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे असे मानले जाते. हळदीकुंकवाचे एक वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमात उखाणे घेण्याची जणू जोरदार स्पर्धा चालू असते. ज्यांना उखाणे घेता येत नाहीत त्यांच्यासाठी गुगलराव आहेतच पटकन मदत करतात. आपल्या हिंदू संस्कृतीत अचानक कोणी स्री आपल्या घरी आली की आपण त्यांना त्यांच्या कपाळाला हळदीकुंकू लावणे आणि हातावर साखर देणे अशी प्रथा आहेच. अजूनही मंदिरात किंवा घरात पूजा करताना हळद-कुंकू देवतांवर वाहिल्यावर तेच कुंकवाचे बोट आपल्या कपाळी लावण्याची प्रथा आहे. पूर्वी महिलांची सामाजिक कोंडी फोडण्यासाठी, त्यांना बोलके करण्यासाठी म्हणून समाज सुधारकांनी हळदी कुंकवाचे कार्यक्रमाचे आयोजन केले होते असे वाटते. महिलेने महिलेशी थेट संवाद साधणे, एखाद्या गोष्टींवर खोलवर चर्चा करणे, सर्वधर्म एकत्रिकरण, आरोग्य समस्या, वैवाहिक समस्या त्याचबरोबर एक सकारात्मक ऊर्जा एकीकडून दुसरीकडे जावी ह्याच उद्देशाने हे कार्य घडले असावे. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती स्त्रियांना पटकन घराबाहेर पडता येत नव्हते, मग हळदी कुंकाच्या निमित्ताने त्या एकत्र येत असत, आपली सुखदुःखे जाणून घेत असत. जसजशी समाजाची प्रगती होत गेली समाज उन्नत होत गेला तसतशी स्रीसुद्धा स्वतंत्र झाली पण हळदी कुंकाची प्रथा मात्र आजही चालूच आहे फक्त त्याचे स्वरूप मात्र जरा बदलले आहे. आज हळदी कुंकाचा कार्यक्रम फक्त आणि फक्त आनंदासाठी, मौजमजेसाठी साजरा केला जातो आहे. फक्त पार्टीच्या हिशोबाने नाचगाणे करून, रिल्स तयार करण्यासाठी हळदीकुंकू समारंभ साजरे होताना दिसत आहेत. आजकाल महिला नोकरी करतात त्यामुळे त्यांना फारसा वेळ पण नसतो. पण आपण आपल्या सणांची माहिती आपल्या पिढीला नक्की द्या. त्यांना समजावून सांगा. उद्या त्यांनी असे म्हटलेच नाही पाहिजे की आम्हाला तर आमच्या आई वडिलांनी याबद्दल काहीही सांगितले नाही. 

          पूर्वापार चालत आलेली ही परंपरा आज आपण हिंदू म्हणून अगदी अभिमानाने ती पुढे चालवली पाहिजे.या अशा कार्यक्रमातून काहीतरी चांगला आदर्श आपण आपल्या पुढच्या पिढीला दिला पाहिजे. आज प्रत्येक स्त्रीला हळदीकुंकू म्हणजे काय ते का साजरे करतात हे आजच्या पिढीला सांगता यावे म्हणून मी या माझ्या लेखातून माझे स्पष्ट मत मांडण्याचा अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे.

धन्यवाद 

 *सौ. वैभवी नंदकुमार मराठे* 

MA B.ed English/psychology( पत्रकार )

नाशिक